गेलेली नजर होईल घारीसारखी तीक्ष्ण! दैनंदिन आहारात नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन
हल्लीच्या डिजिटल युगात सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे मोबाईल आणि लॅपटॉपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. सतत मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर डिजिटल उपकरणांचा वापर केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होऊन जाते. याशिवाय डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांची दृष्टी कमकुवत होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. तसेच हल्ली लहान वयातच अनेकांना चष्मा लागतो. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. डोळे खराब होण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे आहेत. एका जागेवर जास्त वेळ बसून राहणे, कामाचा तणाव, आहारात सतत होणारे बदल, पौष्टिक घटकांची कमतरता, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम डोळ्यांवर लगेच दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोळ्यांची कमकुवत झालेली दृष्टी सुधारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
कमी वयात डोळ्यांना लागलेला चष्मा घालवण्यासाठी नियमित एक गाजर खावे. गाजर खाल्यामुळे डोळ्यांचे रक्षण होते. यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन आणि जीवनसत्त्व अ डोळ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहे. रात्रांधळेपण किंवा डोळ्यांच्या इतर समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित गाजर किंवा गाजरपासून बनवलेले पदार्थ खावेत. याशिवाय बाजारात अनेक वेगवेगळ्या रंगाचे गाजर उपलब्ध असतात. हिरव्या गाजरपासून तुम्ही सूप किंवा सॅलड बनवू शकता.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना पालेभाज्या खायला आवडत नाही. पालेभाज्या पाहिल्यानंतर नाक मुरडतात. पण दैनंदिन आहारात पालेभाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. पालक, मेथी, चाकवत, मोहरी इत्यादी भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला ल्यूटिन आणि झिआक्सँथिन घटक मिळतात. याशिवाय यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळून येतात, ज्यामुळे डोळ्यांचे कमकुवत झालेले स्नायू बळकट होण्यास मदत होते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा पालेभाज्यांचे नियमित सेवन करावे.
आंबट फळे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात. त्यामुळे संत्री, मोसंबी किंवा इतर आंबट फळांचे सेवन करू शकता. डोळ्यांखाली रक्त पुरवठा सुरळीत आणि निरोगी राहण्यासाठी आंबट फळांचे सेवन करावे. आंबट फळांच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. साथीच्या आजारांची शरीराला लागण होऊ नये म्हणून कायम आंबट फळे खावीत.
विटामिन सी युक्त आवळ्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. आवळा खाल्यामुळे डोळे, त्वचा आणि केस कायमच निरोगी राहतात. डोळ्यांची क्षमता सुधारण्यासाठी आवळा खावा. त्यामुळे तुम्ही आवळ्याचा रस, लोणचे किंवा चटणी, आवळ्याचे सरबत बनवून पिऊ शकता. यामुळे डोळे कायमच निरोगी राहतील.
डोळ्यांची नियमित तपासणी किती वेळा करावी?
नेत्ररोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार, वर्षातून एकदा किंवा दोनदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. विशेषतः, लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना नियमित तपासणीची अधिक गरज असते.
डोळ्यांसाठी कोणता आहार घ्यावा?
आहारामध्ये विटामिन ए, सी, ई, आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असणे आवश्यक आहे. यासाठी, गाजर, पालक, मासे, आणि अंडी यांचे सेवन करणे फायदेशीर आहे.
डोळ्यांवर ताण येऊ नये यासाठी काय करावे?
टीव्ही किंवा मोबाईल स्क्रीनकडे जास्त वेळ बघू नका.वाचनासाठी योग्य प्रकाशयोजना ठेवा.प्रत्येक 20 मिनिटांनी 20 सेकंद ब्रेक घ्या आणि 20 फूट दूर असलेल्या वस्तूवर लक्ष केंद्रित करा (20-20-20 नियम).डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी योग्य उपाययोजना करा.