सहा पिढ्या आणि १९३ वर्षांचा बावनकशी ब्रँड म्हणजे पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स; माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पेण (विजय मोकल) :– पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या अलंकारांचे प्रदर्शन पेण येथील हॉटेल सौभाग्य इन इंटरनॅशनल आंबेघर गणपती वाडी येथे भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवशीय या अलंकार प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कोकणातून सांगलीत स्थिरावलेल्या गाडगीळ कुटुंबियांनी पोटापाण्यासाठी सराफी व्यवसाय सुरू केला. सचोटी आणि परिश्रमाच्या बळावर तो रुजवला. गेल्या 193 वर्षांमध्ये गाडगीळांच्या सहा पिढ्यांनी ग्राहकांच्या पिढ्यानपिढ्यांचा विश्वास संपादन केला. पु. ना. गाडगीळ नावाच्या व्यवसायाची आहे, तशीच ब्रँड आणि ग्राहक यांच्यातल्या बावनकशी परस्परसंबंधांचीही आहे.
गणेश नारायण गाडगीळ यांनी 1832 साली कोणाच्या तरी मदतीने सराफीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातूनच पुढे ‘पुरुषोत्तम नारायण गाडगीळ’ या नावाचा हजारो कोटी रुपयांचा ब्रँड उभा राहिला. सराफ कट्टा म्हणजे ओळीने बांधलेले कट्टे होते. गावातले सोन्याचे व्यावसायिक आपापल्या पडशीमध्ये जिनसा घेऊन तिथे यायचे आणि दिवसभर व्यवहार करायचे. या ब्रँडचा जन्म हा सांगलीतल्या छोट्या ओट्यावर झाला. ओट्यापासून सुरू झालेला कॉर्पोरेट ब्रँडपर्यंतचा हा प्रवास अनेक वळणांचा आणि खाचखळग्यांचा आहे. कुटुंबाची एकी, व्यवहारातील सचोटी आणि कामातली चिकाटी या बळावर फार कमी काळात या व्यवसायात गती घेऊन सांगली परिसरात मोठा नावलौकिक मिळवला.
सांगलीपेक्षा मोठं आणि वेगाने विस्तारणारं शहर म्हणून पुण्यात दुकान काढण्याचं ठरलं. लक्ष्मी रोडवर दुकान थाटलं. अपार कष्टाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर गाडगीळ कुटुंबाचा लौकिकही सर्वदूर वाढला.’प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे’ या वचनाला धरून गाडगीळ सराफांनी पुणेकर ग्राहकांचा विश्वास संपादन केला. सोन्याच्या वजनात, गुणवत्तेत आणि किमतीत संपूर्ण पारदर्शकता असल्यामुळे पुणेकरांच्या चिकित्सेसमोर ते न डगमगल्यामुळे गाडगीळांचे अनेक ग्राहक हे त्यांचे ब्रँड ॲम्बॅसॅडर बनले. मंगल कार्यांप्रमाणेच मुहूर्ताची खरेदी ही देखील गाडगीळांनी पुणेकरांना लावलेली सवय असल्याने गुरुपुष्य, दसरा, दिवाळी आणि पाडव्याला थोडं का होईना, सोनं घेणारी शेकडो कुटुंबं आहेत. ‘गाडगीळ सराफ’ नावाचा ब्रँड वेगाने वाढण्यामागे लोकांच्या विश्वास हे कारण होतं.
पी.एन.जींचा त्रिवेणी संगंमगाडगीळांच्या ब्रँडमध्ये एक त्रिवेणीसंगम पाहायला मिळतो. त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या जशा ग्राहकांच्या पिढ्या आहेत तशा काउंटरपलीकडे उभ्या असलेल्या मालकांच्याही पिढ्या आहेत. (सध्या गाडगीळांच्या पाचव्या आणि सहाव्या पिढीच्या हाती सूत्रं आहेत.) तिसरं म्हणजे कारागिरांच्याही अनेक पिढ्या या व्यवसायाशी जोडलेल्या आहेत. सुरुवातीला पुण्यात येताना त्यांनी सांगलीहून कारागीर आणलेले होते. कारण सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरची कलाकुसर, नाजूकपणा आणि नजाकत ही खूपच महत्त्वाची असते.
मूळात नक्षीकाम पसंत पडेपर्यंत कोणतीच स्त्री तो अलंकार खरेदी करत नाही. त्यामुळे कारागीर (खरं तर कलावंत) हा सराफी व्यवसायात अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. गाडगीळांनी सांगलीहून आणलेले कारागीर तर सांभाळलेच, पण पुण्यात आल्यावर अनेक नवे जोडलेही. इतकंच नाही, तर त्यातल्या काहींच्या तीन-तीन पिढ्यांनी गाडगीळांंकडेच दागिने घडवण्याचं काम केलं आहे.
या व्यवसायात जसे कारागीर महत्त्वाचे असतात तसेच दुकानातले कर्मचारीही महत्त्वाचे असतात. पण व्याप वाढला. अधिक मनुष्यबळाची गरज भासू लागली. पण त्यामुळे ग्राहकांना मिळणारी सेवा पातळ होऊन चालणार नव्हतं. कारणं दागिन्यांचं ज्ञान, संवादकौशल्य आणि वागण्यातलं अगत्य या तिन्ही बाबी आवश्यक होत्या. त्यासाठी कर्मचाऱ्यांची सतत प्रशिक्षणं घेणं, त्यांना जास्तीत जास्त सुविधा देणं आणि ते सतत समाधानी राहतील यासाठी प्रयत्न करणं हे सगळं नियमितपणे केलं जातं. पुण्यातल्या एकाच दुकानात वाढणारी ग्राहकांची गर्दी हाताळणं दिवसेंदिवस कठीण होत होतं. या सगळ्याचा परिणाम म्हणून गाडगीळ कुटुंबीयांनी विस्ताराचा निर्णय घेतला. पुण्याच्या अन्य भागांत तर दुकानं काढलीच, पण अगदी खान्देश, रायगड, मराठवाडा आणि विदर्भातही दुकानं उघडली. ‘गाडगीळ सराफ’ नावाच्या ब्रँडची त्रिज्या आणि परीघ रुंदावतो आहे.
193 वर्षांचा हा इतिहासात सहा पिढ्यानीं बावनकशी ब्रँड निर्माण केले ते म्हणजे पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स. पी. एन. जी म्हणजे विश्वास. गाडगीळांनी लोकांचा जो विश्वास मिळवला त्यातूनच त्यांचा ब्रँड उभा राहिला. त्यामागचं कारण त्यांची सचोटी आणि सेवा हेच आहे. अनेक वर्षं मनात जोपासलेला ‘गाडगीळ सराफ’ या दोन शब्दांविषयीचा विश्वास अढळ असतो. एक मराठी कुटुंबाने निर्माण केलेला सराफी ब्रँड हा याही अर्थाने बावनकशी ठरला!