फोटो सौजन्य - Social Media
दिवसाचा कोकण म्हणजे स्वर्गाचा आभास, रात्रीचा कोकण म्हणजे काळोखाच्या खेळाचे मैदान! या खेळात अशा गोष्टी घडतात, ज्या कधीही डोक्यातून न जाणारे अनुभव देऊन जातात. या गोष्टी विसरणे कठीण असतात, कारण या घडणाऱ्या गोष्टी साध्या नसतात. कोकणात देवाचा वारा मोठ्या प्रमाणात आहे, कारण इथल्याच लोकांच्या अनुसार इथे रात्रीच्या वेळी भुताटकीही फार आहे. इथे दोन जणांपैकी एक जण असा मिळून जाईल ज्याने अशा प्रसंगाशी दोन हात केले आहेत, म्हणून कोकणी माणूस देव असो वा भुतं, प्रत्येक गोष्टींमध्ये नॉलेज एकदम टॉपचा ठेवतो.
कोकणातील मंडणगड तालुक्यात घडलेली ही घटना आहे. दोन लहान मुलांना चक्क छबिन्याचे दर्शन घडले. ‘छबिना’ म्हणजे काय? तर वेताळाची पालखी! कोकणात काही भागात याला ‘सबेना’ या नावाने ओळखले जाते. जो व्यक्ती या भुतांच्या पालखीसमोरून आडवा गेला तर असे समजा की तो त्यांच्यातलाच एक झाला. कोकणात आजही सबेना या भुताच्या प्रकाराविषयी अनेक कथा प्रसिद्ध आहेत. तर ही घटना राजू आणि विलास , या दोन बंधूंसोबत घडली. दोघेही वयाने अतिशय लहान होते. अगदी १३-१४ वर्षे त्या दोघांचे वय असेल. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या होत्या त्यामुळे विलास मामाच्या गावी मंडणगडात गेला होता. राजू विलासचा मामेभाऊ!
हे दोघे भावंडं एकमेकांचे अतिशय जिगरी होते. विलास आणि राजू, रात्रीच्या वेळी दोघे घराच्या अंगन्यात झोपत असत. एके दिवशी, घरच्या अंगणात असेच झोपलेले असताना त्यांना नसत्या त्या कल्पना सुचल्या. त्यांच्या घरापासून काही अंतरावर एक अशी जागा आहे, जेथील भुताटकीच्या कथा गावात फार प्रचलित आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनी तिथे जाण्याचे ठरवले. रात्रीचे अडीच वाजलेले असतात. गावात भयाण शांतता असते. पण आकाशात चंद्र नसतो कारण ती रात्र अमावस्येची असते. या काळोख्या रात्री, ते दोघे मंद पावलांनी त्या ठिकाणी येऊन पोहचतात, पण त्यांना तेथे कुणीच दिसून येत नाही. रात्र भयाण आहे पण या किशोरवयी मुलांना त्या गोष्टीचे फार काही भान नसते. ते मस्तीमध्ये आणखीन थोडं पुढे चालत जातात. चालता चालता, राजूला प्रेशर आल्याने, तो टेकडीच्या कोपऱ्यावर असलेल्या एका झाडाच्या खोडावर कार्यक्रम करतो. पण खरा खेळ इथे सुरु होतो.
राजू कार्यक्रम करत असतो आणि विलास तेथेच पण थोड्या दूरवर भावाची प्रतीक्षा करत असतो. तेव्हा त्या दोघांच्या नजरेस टेकडीच्या खालच्या भागातून एक पिवळा प्रकाश दुरून येताना दिसतो. या दरीमध्ये इतक्या रात्री कुणाची वरात येतेय? असा प्रश्न त्या दोघांना पडतो. राजुचा कार्यक्रम होताच, तो दरीमध्ये वाकून पाहण्यापेक्षा विलासकडे धावत जातो. विलास आणि राजू स्तब्ध झालेले असतात कारण त्या दोघांच्या कानावर आता ढोल आणि ताशे तसेच सनईचे सूर गुंजत असतात. त्यापेक्षा भयंकर बाब म्हणजे त्या गर्दीकडून जोरजोरात बांगड्या वाजवण्याचा आवाज येत असतो. असे शेकडो जण एकत्र येऊन बांगड्यांचा आक्रोश करत असल्याचा नाद तेथे घुमत असतो. तो प्रकाश हळू हळू वाढत असतो, त्या प्रकाशसोबत ते स्वर आणि आक्रोशदेखील वाढत असतात. या दोघांना त्या दरीकडे जाऊन वाकून बघण्याची हिंमतच होत नाही.
ज्या ठिकाणच्या भुताटकीच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत, तेथे तर सगळे शांत होते आणि भलतीकडेच भुतं दिसल्यामुळे, ते दोघे घाबरून गेले होते. तो आवाज आणि तो प्रकाश हळू हळू शांत होऊन जातो आणि पुन्हा तेथे भयाण शांतता आणि काळोख पसरतो. पुढे कसलाही वेळ न दवडता, ते दोघे घराकडे जातात. त्यांच्या अंगामध्ये अंगणात झोपण्याचे असलेले किडे, सगळे काही दूर होते आणि दार ठोठावून घरात जाऊन अंगावर गोधड्या घेऊन झोपून जातात. महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रसंगामुळे दोन दिवसांसाठी राजू तापाने फणफणला असतो.
टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही