फोटो सौजन्य - Social Media
मे महिना आला तर गावी जाण्याची आस लागते. ही आस कोकणकरांसाठी काही नवीन नाही. संपूर्ण बालपण जरी मुंबई पुण्यासारख्या शहरात गेले, तरी गावी जाण्याची हौस प्रत्येकाला लागून असते. तशीच काही तरी इच्छा रिटाची होती. रिटा तशी १२ वर्षांची चिमुकली! मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणून आई वडिलांकडे गावी जाण्याचा हट्ट धरला. तिच्या या हट्टापोटी आई वडिलांनी गावी जाण्याचा निर्णय मान्य केला.
कोकणातील मंडणगड तालुक्यात रिटाच्या वडिलांचे गाव होते. रीटाला आजोबा नाही आहेत. तिच्या गावी फक्त तिची आजी राहत असे. गावचा घर आणि थोडी काही बाग जमीन, इतकाच काय तो आजीचा संसार! सगळी मुलं बाळं मुंबईत असल्याने गावचा सांभाळ करण्यासाठी आजीबाई गाव काही सोडायला मागत नव्हती. रिटा आजीची लाडकी! रीटालाही आजीला भेटण्याची आस होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी रिटा आणि तिचे आईवडील गावाकडे रवाना होतात. रिटा फार उत्सुक असते. घरातच गाडी असल्याने ते संध्याकाळच्या सुमारास गावाकडे निघाले असतात.
मंडणगड तसा मुंबईपासून साडे ४ ते ५ तासांच्या अंतरावर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही लोकं गावी येऊन पोहचतात. पण त्यावेळी त्यांना दार थोटवून आत घरी जाण्याची गरज भासत नाही. कारण दार आधीच उघडे असते. त्यांचे घर हे जुने मातीचे असते. घरात पाऊल ठेवताच त्यांना एक भयाण शांतता जाणवते. घरात पोहचताच ते आजीला आवाज देतात. “आई… तू कुठे आहेस?”. पण आतून आजीचे उत्तर येत नाही. शोधता शोधता रिटा मागच्या दारात जाऊन पोहचते. तेव्हा तिला तिथे आजी चुली जवळ एकटक बसलेली दिसते. आजी पूर्णपणे शांत असते. रिटा आजीला हाक मारते पण आजी काहीच उत्तर देत नाही. रिटा इतरांना मागच्या दारात येण्यास सांगते. इतर सगळी मंडळी मागच्या दारात येऊन थांबते. आजीला हाक मारतात पण आजी कोणालाही काहीच उत्तर देत नाही.
अनेक प्रयत्नांनंतर सगळी जणं बाहेर येऊन बसतात. आजी बोलत का नाहीये? आपल्याकडे बघत का नाही? या सगळ्या प्रश्नांनी त्या तिघांचे डोकं त्रासून जातं. पहाट होत आलेली असते. आजी मागच्या दारातून बाहेर येते. कुणाकडे पाहतही नाही. अगदी मंद पावलांनी बाहेर येत आजी तिच्या खोलीत जाते. सगळीजणं तिच्या पाठोपाठ आजीच्या खोलीत जातात. आजी कुणाशी काही न बोलता, तिच्या गादीवर जाऊन पडते आणि डोळे मिटून घेते. पाहता पाहता सकाळ होते. रिटा आणि तिचे आई-वडील त्यांच्या खोलीत आराम करत असतात. रिटाची आई उठते, स्वयंपाक घरात जाते. सगळं हुरकून रिटा आणि तिच्या वडिलांना नाश्त्यासाठी उठवते. रिटाची आई आजीला उठवण्यासाठी आजीच्या रूममध्ये जाते. पण अनेकदा हाक मारूनही आजी काही उठेना. आजीच्या अंगाला हात लावले असता आजीचे अंग गरम पडलेले असते.
रिटाची आई रिटाच्या बाबांना हाक मारते आणि आजीच्या रूममध्ये येण्यासाठी सांगते. रिटाचे बाबा आजीला उठवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात पण आजी काही उठत नाही. पण आजीचे शरीर तापलेले असल्याने आणि रात्री ज्या पद्धतीने आजी वागत होती, ते पाहता रिटाचे बाबांना वाटत की, “आजीला ताप आला आहे. झोपली आहे. झोपू दे. नंतर उठेल.” त्यांच्या गावापासून तालुक्याचे ठिकाण तसे लांब! तसेच गावी कुणी डॉक्टर किंवा वैद्यही नाही.
संध्याकाळचे सात वाजतात. आजी अचानक उठून तिच्या खोलीतून बाहेर येते. आजी मंद पावलांनी मागच्या दारात जाऊन चुलीशी बसते. रिटा असो, रिटाचे बाबा असो किंवा रिटाची आई… सगळीजणं तिला हाक मारतात पण म्हातारी अशी वागत असते जसे तिला या घरात कुणी दिसतच नसतं. घरामध्ये एक वेगळीच शांतता असते. बत्तीची वेळ असल्याने रिटाचे बाबा घरी देवासमोर दिवा आणि अगरबत्ती लावतात. तेव्हा आजी मागच्या दारात अचानक ओरडू लागते. पण आजी ज्या आवाजात ओरडत असते, तो आवाज आजीचा नसतोच. एका वेगळ्याच आवाजात आजी मागच्या दारात किंचाळत असते. रिटा आणि रिटाची आई स्वयंपाक घरातून पळत बाहेर येतात. दोघेही घाबरलेले असतात. रिटाचे बाबा आजीला काय झालंय हे पाहण्यासाठी मागच्या दारात जातात. पण त्यांना पाहताच आजी आणखीन जोरजोरात किंचाळू लागते. आजीचे डोळे लालभून झालेले असतात. रिटाच्या बाबांना हे प्रकरण काय ठीक वाटत नाही. रिटाचे बाबा शैतान अवस्थेत असणारी आजी आत घरी येऊ नये म्हणून मागचा दार लावून घेतात.
रिटाचे बाबा शेजारच्या वाडीत असणाऱ्या एका तांत्रिकाकडे पळत जातात. त्यांना कालपासून घडलेली सगळी घटना समजवतात. तेव्हा त्या तांत्रिकाचे उत्तर हेच असते की, “तुझ्याघरी जी म्हातारी आहे, ती तुझी आई नाही. तुझी आई जाऊन ३ दिवस झाले आहेत.” रिटाचे बाबा म्हणतात, “पण हे कसं शक्य आहे? काल मी स्वतःच्या डोळ्यांनी माझ्या आईला चालताना पाहिले आहे, मागच्या दारात बसलेले पाहिले आहे.” तेव्हा तांत्रिक म्हणतो की, “ते शरीर तुझ्या आईचेच आहे. पण तुझ्या आईच्या आत्म्याने ते शरीर तीन दिवसाअगोदरच सोडले आहे आणि वेळीच अग्नी न मिळाल्यामुळे एका भटक्या आत्मेने त्या शरीरात प्रवेश केला आहे. आता जी कुणी तिथे आहे, ती मुळीच तुझी आई नाही. म्हणून वेळ दवडू नकोस. तो सैतान… सगळ्यांना गिळून टाकेल.”
तांत्रिक आणि रिटाचे बाबा दोघेही पळत रिटाच्या घरी येतात. मागच्या दारातून दार ठोठावण्याचा आवाज सारखा येत असतो. तो राक्षसी आवाज त्यांच्या कानावर पडत असतो. रिटा आणि रिटाची आई तर घाबरून देवाचे नामस्मरण करत अंगणात एकमेकांना मिठी मारून बसलेले असतात. तांत्रिक मागच्या दारात जाऊन मंत्रोपचारने त्या शरीराची त्या आत्म्यापासून सुटका करतो. जशी ती आत्मा त्या शरीरातून मुक्त होते, तसे आजीचे शरीर लुळे पडते. रिटाचे बाबा पळत, आजीकडे जातात. आजीला स्पर्श करून पाहतात तर आजीचे तापलेले शरीर थंड पडलेले असते. येत्या सकाळी कसलाही वेळ न दवडता, आजीच्या शवाला अग्नी दिली जाते.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)