फोटो सौजन्य - Social Media
कष्ट केल्याने भाकर मिळते. पण कधी कधी कष्ट करताना अशा काही गोष्टी नजरेस पडतात की भाकर काय, तोंडाचं पाणीही पळून जातं. अशीच एक अंगावर शहारे आणणारी घटना खार पश्चिममधील खारदांडा परिसरात घडली. ही घटना अनेक दशकांपूर्वीची असली, तरी जिच्यासोबत ती घडली, तो विजय, त्याच्या आठवणीत आजही ताजी आहे. विजय एक होतकरू तरुण. खार दांड्यात त्याच्या वडिलांचं देवपूजेच्या साहित्याचं दुकान होतं. विजय हार विणण्यात कुशल होता. त्यांच्या दुकानातून फुलांचे हार बनवून खार परिसरात मोठमोठ्या कलाकारांच्या घरात पोहोचवले जात. त्यांचा व्यवसाय फार विस्तारलेला होता. यासाठी विजय रोज मध्यरात्री 3 वाजता दुकानात जाऊन हार विणायचा.
सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं. रात्रीच्या त्या वेळी रस्त्यावर माणसांची वर्दळ नसली, तरी गल्लीतील कुत्री, मांजरी थोडं थोडं भासत. पण अचानक विजयच्या आयुष्याच्या कथांनी काही वेगळंच वळण घेतलं. त्या रात्री विजय नेहमीसारखा घरातून दुकानाच्या दिशेने निघाला. मध्यरात्रीचे 3 वाजले होते. विचित्र बाब म्हणजे आज रस्त्यावर एकही कुत्रं, मांजर दिसत नव्हतं. अंधारात तो पुढे चालू लागला. वातावरण नेहमीपेक्षा जास्त शांत, आणि भयाण वाटत होतं. दुकानाजवळ पोहोचल्यावर त्याला एक विचित्र आकृती दिसली. मान नसलेलं एक धड! ते जीवंतपणे दुकानाच्या शेजारून चालत जात होतं. विजय घामाघूम झाला, एक शब्दही तोंडून फुटेना. तेवढ्यात ती आकृती अचानक गायब झाली. विजय थरथरत दुकानात गेला आणि देवाचं नामस्मरण करत कामाला लागला.
दुसऱ्या रात्री पुन्हा तसंच झालं. यावेळी त्याला धड नव्हे, तर फक्त मान दिसली. पुन्हा त्याच ठिकाणी, दुकानाच्या बाजूनं जाताना! विजय पुन्हा घाबरत पळत दुकानात गेला आणि देवाचे नामस्मरण करून कमला सुरुवात केली. तिसऱ्या रात्री विजयने त्याच्या आईला सोबत नेण्याचं ठरवलं, पण तिला याबद्दल काही सांगितलं नाही. आईसोबत तो निघाला. रस्त्यावर शुकशुकाट. गल्लीतून बाहेर आल्यावर विजयने त्या आकृतीस पाहिले आणि आईला विचारलं, “आई, तुला तिकडे कुणी दिसतंय का?” आईने नाही म्हणताच विजय हादरला. त्याने आईला घरी पाठवलं आणि स्वतः दुकानात जाऊन काम सुरु केलं.
चौथ्या रात्री विजयने मनाशी ठरवलं “या आकृतीशी आज दोन हात करायचं!” तो रात्री 3 वाजता घराबाहेर पडला आणि सुसाट धावतच दुकानाजवळ पोहोचला. रागानं ज्या ठिकाणी आकृती दिसते तिथे जात म्हणाला, “काय रे? घाबरतोस का? चल समोर ये. एकतर तू राहशील नाहीतर मी!” विजयने शिव्याशाप घालत चॅलेंज दिलं, पण त्या रात्री काहीच दिसलं नाही. शांतता होती, पण भयाण नव्हती. पाचव्या रात्री विजय पुन्हा निघाला. आज गल्लीत कुत्री, मांजरी परत दिसू लागली होती. विजयने एक क्षण थांबून आजूबाजूला पाहिलं. पण ती विचित्र आकृती पुन्हा कधीच दिसली नाही. आजही, त्या थरारक आठवणी विजयच्या मनात घर करून बसल्या आहेत. पण त्याने त्या भीतीवर मात करत स्वतःला सिद्ध केलं कारण खरंच, भीती पळते तेव्हा, जेव्हा तिला सामोरं जाण्याचं धाडस आपण दाखवतो.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)