फोटो सौजन्य: pinterest
महाराष्ट्रात कोकण आणि भारतात पंजाब म्हणजे तांदळाचं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोकणाचा विचार करायचा झाला तर भात आणि मासे हे प्रमुख अन्न म्हटलं जातं. भारतात प्रामुख्याने बासमती, इंद्रायणी आणि कोलम या जातीच्या तांदळाला जास्त पसंती दिली जाते. फक्त भारतातच नाही तर जगभरात अनेकांना भात खायला आवडतो. पण तुम्हाला माहितेय का जगभरात तांदळाच्या एकूण 40 हजार पेक्षा जास्त जाती आहे. आशिया खंडाचा विचार करायचा झाला तर बहुतांश देशात तांदुळ हे प्रमुख पीक आहे आणि त्यात भारताचा देखील समावेश आहे. आशियाई तांदूळ, आफ्रिकन तांदूळ, जंगली तांदूळ,कॅलिफोर्निया,कॅनेडियन,ऑस्ट्रेलियन अशा विविध तांदळाच्या जाती आहे.
तांदळाच्या वेगवेगळ्या जातीला वाण असंही म्हटलं जातं. मात्र यातील काही तांदळाचे वाण असे आहेत ज्यांचंआरोग्याच्या दृष्टीने महत्व खूप जास्त आहे. कोणते आहेत हे तांदळाचे वाण चला तर मग जाणून घेऊयात.
बांबू तांदूळ
तांदळाच्या कोणत्याही प्रजाती असल्या तर सहसा तांदूळ हा पांढऱ्या रंगाचा असतो. मात्र बांबू तांदूळ चक्क हिरव्या रंगाचा दिसतो. याचं वैशिष्ट्यं म्हणजे बांबूच्या झाडाजवळ याची लागवड केली जाते. बांबूतील पोषक घटक यात उतरतात त्यामुळेच हा रंगाने हिरवा दिसतो. यात व्हिटामीन बी 3 आणि लिकोनिक अॅसिड सारखे पोषक घटक असतात जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.
मोगरा तांदूळ
नावाप्रमाणेच याचा सुगंधही तसाच आहे, म्हणूनच याला मोगरा तांदूळ असं म्हणतात. हा बासमती तांदळाचाच एक प्रकार आहे. या तांदूळ खासकरुन पंजाब आणि पाकिस्तानमध्ये जास्त पीकवला जातो. यातील व्हिटामीन बी जीवनसत्वांमुळे हाडांची झीज भरुन निघते. त्याचबरोबर झिंकचं प्रमाण असल्याने त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी याचं सेवन फायदेशीर मानलं जातं.
तपकिरी तांदूळ
तपकिरी रंगाच्या तांदळाचं पीक हे हिमाचल प्रदेशात प्रामुख्याने घेतलं जातं. तपकिरी रंगाच्या तांदळात कॅलरीज कमी असतात. त्यामुळे तुम्ही जर भातप्रेमी असाल आणि तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर हा तांदूळ तुमच्यासाठी वरदान आहे. तपकिरी रंगाच्या तांदळाचा भात रोज सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
काळा तांदूळ
चीन, कोरिया, जपान, थायलंड, फिलीपिन्स या देशात हा तांदूळ जास्त पाहायला मिळतो. भारतात याची शेती क्वचितच होते. या तांदळामध्ये प्रोटीन आणि फायबरचा स्त्रोत मोठ्या प्रमाणात असतो. त्याचबरोबर व्हिटॅमिन ई आणि लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्ताची कमतरता देखील दूर होते.
सोना मसुरी
तामिळनाडूमध्ये या तांदूळ बऱ्यापैकी प्रचलित आहे. दाक्षिणात्य भागात या तांदळाला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. या भाताच्या सेवनाने रक्तातील दोष किंवा कमतरता भरुन निघण्यास मदत होते.
जंगली तांदूळ
सततच्या जंक फूड किंवा फास्टफूडच्या सेवनाने आतड्यांचं आरोग्य खराब होतं. जर तुम्हाला तुमच्याआतड्यांना निरोगी ठेवायचं असेल तर जंगली तांदळाचं सेवन हा रामबाण उपाय आहे. हा काहीसा काळपट चॉकलेटी रंगाचा दिसतो. कॅनडामध्ये याची शेती केली जाते. असं म्हटलं जातं की, याच्या सेवनाने हृदय विकाराच्या आजारातून लवकर बरं होण्यास मदत होते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.