फोटो सौजन्य - Social Media
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याच्या अनेक समस्या वाढत चालल्या आहेत, त्यातीलच एक सामान्य पण वेदनादायक समस्या म्हणजे किडनी स्टोन! म्हणजेच मूत्रपिंडातील खडे! अनेक लोक या त्रासाला सामोरे जातात, परंतु योग्य काळजी आणि आहार घेतल्यास ही समस्या टाळता येऊ शकते.
किडनी स्टोन काय असतो?
किडनी स्टोन म्हणजे मूत्रपिंडात तयार होणारे खडे, जे विविध प्रकारच्या क्षारांपासून तयार होतात. यामध्ये कॅल्शियम, ऑक्सालेट, युरिक अॅसिड हे घटक प्रमुख असतात. हे खडे कधी लहान असतात आणि शरीरातून नैसर्गिकरित्या बाहेर पडतात, पण कधी-कधी त्यांचा आकार वाढल्यास ते मूत्रमार्गात अडकून मोठा त्रास निर्माण करतात.
लक्षणं
किडनी स्टोन सुरुवातीस कोणतेही ठोस लक्षण दाखवत नाही. मात्र जेव्हा त्याचा आकार वाढतो, तेव्हा काही लक्षणे दिसू शकतात. जसे की पाठीच्या खालच्या भागात किंवा पोटात तीव्र वेदना होणे, लघवी करताना जळजळ किंवा रक्त येणे, वारंवार लघवीची इच्छा आणि जंतुसंसर्ग होणे, मळमळ तसेच उलटी येणे किंवा ताप येणे (जास्त गंभीर अवस्थेत).
ही समस्या का उद्भवते?
शरीराला आवश्यक तेवढे पाणी न दिल्यास मूत्रामधील क्षार साचून राहतात आणि खडे बनतात. अति सोडियममुळे मूत्रात कॅल्शियम वाढते, जे स्टोन तयार करतं. पालक, चहा, चॉकलेट, शेंगदाणे, बेरीसारख्या पदार्थांमुळे ऑक्सालेट पातळी वाढते. जर कुटुंबात कुणाला ही समस्या असेल, तर इतर सदस्यांनाही धोका अधिक असतो. गाऊट, पचनतंत्राच्या समस्या, किंवा शरीरात कॅल्शियमची असंतुलित मात्रा यामुळे ही मूत्रपिंडामध्ये अशा समस्या किंवा खडे तयार होण्याची शक्यता अमाप असते.
या समस्येत दररोज २.५ ते ३ लिटर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. संतुलित आहार ठेवावा, विशेषतः ऑक्सालेटयुक्त अन्न मर्यादित घ्यावं. मिठाचे प्रमाण कमी ठेवणे (रोज ५ ग्रॅमच्या आत), कॅल्शियमयुक्त पदार्थ योग्य प्रमाणात आहारात घेणे तसेच वजन नियंत्रणात ठेवणं व नियमित व्यायाम करणं, अशा पथ्यांचा नियमित सराव केल्यास किडनी स्टोन टाळता येतो.
किडनी स्टोन ही जरी सामान्य समस्या असली, तरी ती वेळेवर निदान आणि योग्य सवयींमुळे पूर्णपणे टाळता येऊ शकते. पाणी पिण्याच्या सवयी सुधारल्या आणि अन्नात योग्य बदल केल्यास आपण हे खडे निर्माण होण्यापासून वाचू शकतो. आरोग्याविषयी जागरूक राहणं हीच या समस्येवरची खरी इलाज आहे.