
जगातील सर्वात रहस्यमय मंदिर : पद्मनाभस्वामी मंदिराच्या न उघडलेल्या सातव्या दरवाजाचे रहस्य काय?
2011 मधील खजिना उघडकीस आणि सातव्या दरवाज्याचा वाद
सन 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंदिरातील काही तहखाने उघडण्यात आले. त्यामधून सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान हिरे-मोती, सोन्याच्या मूर्ती, मुकुट तसेच हजारो वर्षे जुनी नाणी सापडली. या खजिन्याची किंमत आज १ ते २ लाख कोटी रुपयांपर्यंत असल्याचा अंदाज आहे.
मात्र, जेव्हा सातवा तहखाना उघडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा त्यावरील भव्य नागमूर्ती पाहून पुजारी आणि स्थानिक लोकांनी तीव्र विरोध केला. त्यांच्या मते हा दरवाजा उघडणे अत्यंत अपशकुनाचे ठरू शकते. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयानेही हा तहखाना न उघडण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून तो बंदच आहे.
सातवा दरवाजा का उघडला जात नाही?
लोककथांनुसार, या दरवाज्याचे रक्षण स्वतः अनंत शेषनाग आणि नागदेवता करत आहेत. हा दरवाजा लाकडी असून त्यावर दोन मोठे नाग कोरलेले आहेत आणि त्याला कोणतीही कुलूप-चावी नाही. अशी मान्यता आहे की हा दरवाजा फक्त योग्य पद्धतीने गरुड मंत्राच्या शुद्ध जपानेच उघडू शकतो.
चुकीच्या मार्गाने तो उघडण्याचा प्रयत्न केल्यास नैसर्गिक आपत्ती, भूकंप किंवा मोठी आपत्ती येऊ शकते, असेही सांगितले जाते. 1930 च्या दशकात असा प्रयत्न झाला असता, अचानक साप बाहेर आल्याची दंतकथा प्रचलित आहे, त्यामुळे तो प्रयत्न अर्धवटच सोडण्यात आला.
त्रावणकोर राजघराण्याचे अद्वितीय समर्पण
इ.स. 1750 मध्ये त्रावणकोरचे महाराजा मार्तंड वर्मा यांनी आपले संपूर्ण राज्य आणि संपत्ती भगवान पद्मनाभस्वामींना अर्पण केली. त्यांनी स्वतःला ‘पद्मनाभ दास’ घोषित केले आणि तेव्हापासून मंदिराची जबाबदारी राजघराण्याच्या ट्रस्टकडे आहे. अनेक पिढ्यांमध्ये राजांनी जे अपार धन जमा केले, ते सर्व भगवान विष्णूंच्या सेवेसाठी या तहखान्यांमध्ये सुरक्षित ठेवले गेले, अशी श्रद्धा आहे. त्यातील सातवा दरवाजा सर्वात गुप्त आणि शक्तिशाली मानला जातो.
महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
अलौकिक शक्तीचे प्रतीक
2011 नंतर मंदिराच्या व्यवस्थापनासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष समिती नेमली. सहा तहखान्यांचे ऑडिट झाले असले, तरी सातवा दरवाजा आजही बंदच आहे. अनेक संत, साधू आणि अभ्यासकांचे मत आहे की हा दरवाजा उघडणे मानवी शक्तीच्या पलीकडचे आहे. पद्मनाभस्वामी मंदिरातील सातवा दरवाजा हा केवळ खजिन्याचा प्रवेशद्वार नसून, तो भगवान विष्णूंच्या दैवी शक्तीचा आणि श्रद्धेचा अद्भुत प्रतीक मानला जातो. त्यामुळे आजही हे गूढ अढळ असून, जगभरातील लोकांच्या कुतूहलाचा विषय बनले आहे.