
मुंबई : गरुड पुराण हे हिंदू धर्माच्या 16 पुराणांपैकी एक पुराण आहे. गरुड पुराणात (Garud Puran) मृत्यूनंतरच्या प्रवासाचं तपशीलवार वर्णन भगवान विष्णूंनी केलं असल्याची श्रद्धा आहे. घरात कुणाचा मृत्यू झाला तर गरुड पुराणाचे पठण केले जाते. हिंदू धर्मानुसार, अंतिम संस्कारासह 13 दिवस अनेक विधी केले जातात. त्या 13 दिवसांत गरुड पुराणाचा विधीही करण्यात येतो.
मृत व्यक्तीचा आत्मा हा 13 दिवस घरात असतो आणि तो आत्माही या दिवसाांत गरुड पुराण नातेवाईकांसोबत ऐकतो, अशी श्रद्धा आहे. आत्म्याला संसारिक आसक्ती सोडणं आणि मोक्ष मिळवण्यासाठी गरुड पुराणाचं वाचन लाभदायी ठरतं अशी मान्यता आहे. गरुड पुराणात यासह अनेक महत्त्वाच्या बाबी सांगण्यात आलेल्या आहेत. ज्यांचं पालन केल्यानं जीवन सोपं, साधं आणि यशस्वी होतं, अशी मान्यता आहे.
गरुड पुराण नेमकं काय आहे?
गरुड पुराण हा वैष्णव पंथांशी संबंधित धर्मग्रंथ आहे. पक्षांचा राजा आणि भगवान विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडानं परमेश्वराला मृत्यू, यमलोक यात्रा, नरक, मोक्ष याबाबत अनेक गूढ प्रश्न विचारले होते, विष्णूंनी या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली आहेत. प्रश्नोत्तरांच्या या मालिकेला गरुड पुराण असं म्हणतात. यात स्वर्ग-नरक, पाप-पुण्य, पुनर्जन्म इत्यांदीविषयी ज्ञान, विज्ञान, आचार, नियम, धर्म याबाबतच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एककीडं मृत्यूचं रहस्य सांगतानाच, गरुड पुराणात यशस्वी जगण्याचं रहस्यही सांगितलेलं आहे. या पठणानं मृत्यूपूर्वीची आणि नंतरची स्थिती समजते. यातून मनुष्य चांगले पुण्यकर्म करतो, अशी श्रद्धा आहे.
मृत्यू झालेल्या घरात करतात गरुड पुराणाचं पठण…
मृत्यू झाल्यानंतर आत्मा हा १३ दिवस घरात कुटुंबीयांसोबत असतो, अशी धारणा आहे. अशा काळात हे पठण केल्यानं आत्म्याला स्वर्ग, नरक, गती, सद्गती, दु:ख, याचा अर्थ कळतो. मृत व्यक्ती त्याच्या कर्मानं आता पुढच्या कोणत्या वाटेला जाईल आणि कोणत्या जगात जाईल, याची माहिती त्या आत्म्याला कळते. तर घरातील नातेवाईकही हे गपुड पुराम ऐकत असल्यानं पाप आणि पुण्य याबाबतच्या त्यांच्या धारणाही पक्क्या होतात. आयुष्यात चांगल्या कृती कराव्यात, असा संदेश या पुराणाच्या पठणातून मिळतो.