राज्याला कुपोषणाचा विळखा, १ लाख ८२ हजार कुपोषित बालकांची नोंद
राज्यात १ लाख ८२ हजार ४४३ कुपोषित बालके आढळली असून त्यापैकी ३० हजार ८०० बालके तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. तर १ लाख ५१ हजार ६४३ बालके मध्यम कुपोषित श्रेणीत असल्याची माहिती राज्य सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. मुंबई उपनगर जिल्हयात तीव्र कुपोषित बालकांची संख्या सगळयात जास्त असून ती २ हजार ७७८ इतकी असल्याची आकडेवारी देण्यात आली आहे.
राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उपाययोजनांबाबत काँग्रेसचे सदस्य विकास ठाकरे व अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात महिला व बाल विकास विभागाने कुपोषित बालकांची आकडेवारी दिली. राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनिसांची सुमारे ३ हजार ६०२ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिकांचीही पदे रिक्त आहेत. ही रक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.राज्य सरकारन मुबई, उपनगर, ठाण शहर, ठाणे ग्रामिण, नाशिक, पुणे, धुळे, संभाजीनगर आणि नागपूरमधील २०२५ मधील पोषण ट्रॅकची आकडेवारीही लेखी उत्तरात दिली आहे. त्यात राज्याच्या कुपोषणाचे भयानक वास्तव समोर आले आहे.
भाजपाचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी इंग्रजी भाषेच्या मुददयावरून गुरूवारी सरकारला विधानसभेत घरचा आहेर दिला. मी १९९५ पासून विधानसभेत आहे. पण कधी इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका बघितली नव्हती. आज पहिल्यांदाच मला इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका मिळाली आहे. इंग्रजीला हे अलिंगन का असा सवाल करत, विधानसभाध्यक्षांनी नियम समितीची बैठक घेउन इंग्रजी शब्दच काढून टाकावे अशी मागणी त्यांनी केली. त्यावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपण सुरूवातीपासूनच मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत कार्यक्रम पत्रिका देतो. ९ सदस्यांनीच माझ्याकडे इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका असावी अशी मागणी केली होती असे म्हटले. सुधीर मुनगंटीवार यांनी इंग्रजीचा मुद्दा उपस्थित करताना म्हटले, मला कल्पना आहे की आपल्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेची नियमात तरतूद आहे. पण मी १९९५ पासून या सदनाचा सदस्य आहे. कधी इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका पाहिली नव्हती. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी आली पाहिजे असा आपला प्रयत्न असतो. ज्यांना येत नाही त्यांना हिंदीचा पर्याय आहे. मग हे इंग्रजीला अलिंगन कशाला. एकतर मराठी आलीच पाहिजे. अगदीच अडचण असेल तर हिंदी चालेल. पण ज्याला इंग्रजीच हवी आहे त्याला पासपोर्ट काढून इंग्लंडला पाठवा, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.