फोटो सौजन्य - Social Media
आपण रोजच आरोग्याची काळजी घेतो. पौष्टिक आहार घेतो, नियमित व्यायाम करतो आणि आरोग्यदायी जीवनशैली ठेवायचा प्रयत्न करतो. तरीही अनेक वेळा हाडं कमजोर वाटतात किंवा शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं जाणवतात. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटू शकतं, विशेषतः जेव्हा आपण दुध, ताक, चीज यासारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ रोज घेतो. पण कधी कधी आपल्या दैनंदिन सवयींचाच परिणाम हाडांवर होतो. काही अन्नपदार्थ असे असतात, जे शरीरातील कॅल्शियम हळूहळू कमी करतात, आणि वेळेवर लक्ष न दिल्यास ऑस्टिओपोरोसिससारखे आजार उद्भवू शकतात.
कोल्ड ड्रिंक आणि चहा
कोल्ड ड्रिंकमध्ये फॉस्फोरिक अॅसिड असतो, जो शरीरातील कॅल्शियमचे शोषण कमी करतो. सतत कोल्ड ड्रिंक पिणाऱ्यांच्या हाडांवर याचा विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे, चहा किंवा कॉफीमधील अधिक प्रमाणातील कॅफिन देखील हाडं कमकुवत करण्यास कारणीभूत ठरते.
साखरयुक्त अन्नपदार्थ
केक, मिठाई, कुकीज यांसारख्या पदार्थांमध्ये असलेली प्रोसेस्ड साखर शरीराच्या कॅल्शियम शोषण प्रक्रियेवर परिणाम करते. साखरेचा अतिरेक केवळ दातच नव्हे तर हाडंही कमजोर करतो.
जास्त मीठ आणि मद्यसेवन
मीठामध्ये असलेले सोडियम किडनीमार्फत कॅल्शियम बाहेर टाकण्यास कारणीभूत ठरते. WHO नुसार, दिवसाला ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर दारूचे सेवन शरीरातील व्हिटॅमिन D च्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करून कॅल्शियम शोषण कमी करते.
तेलकट आणि प्रोसेस्ड अन्न
फास्ट फूड, तुपकट आणि फ्राय पदार्थांमध्ये असलेले सॅच्युरेटेड फॅट्स शरीरात कॅल्शियम शोषायला अडथळा आणतात. यामुळे शरीरात कॅल्शियमचा योग्य वापर होऊ शकत नाही, आणि हाडं कमकुवत होतात.
रेड मीट
जास्त प्रमाणात रेड मीट सेवन केल्यास युरिक अॅसिड वाढतो, जो हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. यामुळे कॅल्शियमच्या शोषणात अडथळा निर्माण होतो आणि हाडांची ताकद कमी होते.
हाडं मजबूत ठेवण्यासाठी केवळ कॅल्शियमयुक्त अन्न घेणं पुरेसं नाही. त्याचबरोबर आपल्याला काही सवयी आणि अन्नपदार्थांपासून दूर राहणं गरजेचं आहे. निरोगी हाडांसाठी संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली हाच उत्तम मार्ग आहे.