
शॉर्टसर्किटमुळे 10 एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
पुणे : काठापूर बुद्रुक (तालुका आंबेगाव) येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये १० एकर ऊस शुक्रवारी (दि. २५) जळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काठापूर परिसरात गेल्या एक महिन्यात शॉर्टसर्किटमुळे उसाचे नुकसान झाल्याची दुसरी घटना घडली आहे.
काठापूर बुद्रुक येथे दुपारी एकच्या सुमारास विजेच्या तारांमधे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे ऊस पिकाला आग लागली. यामध्ये शेतकरी पियुष गांधी, गणपत कांबळे, दत्तात्रय कांबळे, कांताराम कांबळे व इतर शेतकऱ्यांच्या शेतातील उस जळून गेला आहे. ही शेती एकमेकाला लागून असून, या सर्वच १० ते १२ एकरमधील क्षेत्रावर उसाचे पीक होते. या ठिकाणी अचानक वीजवाहक तारांमध्ये घर्षण होत ऊसाला आग लागली. यामध्ये मोठं नुकसान झाले आहे.
नुकसान भरपाई मिळावी
महिनाभर पुन्हा एकदा आगीची घटना घडल्याने १० एकर क्षेत्रावरील उस जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तोडणीला आलेला ऊस वाया जाणार आहे. साखर कारखाने अजूनही एक ते दीड महिन्यात सुरू होणार नाही. त्यामुळे ऊस कारखाना हा उस तोडून नेणार नाही. शेतकऱ्यांची आर्थिक हानी झाली असून, महावितरणच्या वतीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सरपंच अशोक करंडे व शेतकऱ्यांनी केली आहे.
महिन्यातील दुसरी घटना
काठापूर बुद्रुक या ठिकाणी एमएससीबी विभागाचे सब स्टेशन आहे. या ठिकाणावरून आजूबाजूच्या परिसरातील गावांना वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे काठापूर बुद्रुक गावात विजेच्या तारा पसरलेल्या आहेत. अनेक ठिकाणी वीज तारांची उंची कमी आहे. तर काही ठिकाणी तारांना झोळ आहे. त्यामुळे या ठिकाणी आगीच्या अनेक घटना घडत असतात. मागील एक महिन्याभरापूर्वीही अशीच आग लागली होती.