LIGHT (फोटो सौजन्य- PINTEREST)
वर्धा: शेतकऱ्यांना दिवसात १२ तास वीज देण्याचे आश्वासन दिले होते. लवकरच राज्याच्या ८० टक्के भागातील शेतकऱ्यांना दिवसभर १२ तास वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवाय केंद्र सरकारच्या सूर्य घर योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराला ३०० युनिटपर्यंत वीज मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे ७२० कोटी रुपयांच्या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. राज्यात विजेचे बिल दरपाच वर्षांनी कमी करून दाखवू, असे करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. लोअर वर्धा प्रकल्पावर पाचशे मेगावॉट विजनिर्मितीचा प्रकल्प उभा राहतो आहे. त्यामुळे वर्धा जिल्हा विजेच्या व सौरऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. आर्वी तालुक्यातील नेरी (मिर्झापूर) या गावाने सूर्य घर योजनेचा लाभ घेत सर्व घरांवर सौरप्लेट उभारल्या आहेत. त्यामुळे हे गाव संपूर्ण सौर ऊर्जा असलेले सौरग्राम झाले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
विदर्भ होईल सुजलाम् सुफलाम् वैनगंगा-नळगंगा हा प्रकल्प विदर्भाची
सुजलाम सुफलाम करणारा आहे. १ लाख कोटींचा निधी खर्च करून पूर्णत्वास जाणाऱ्या या प्रकल्पाचा अंतिम आराखडा सध्या तयार केला जात आहे. १० जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून ५५० किमीची नदी तयार केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे ६५ टीएमसी पाणी विदर्भाला मिळणार असून, पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची समस्या निकाली निघणार आहे. कोरडवाहू शेतजमीन सिंचनाखाली येणार असून, याचा लाभ वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील इतर जिल्ह्यांनाही होणार आहे. विहिर पुनर्भरण कार्यक्रमही वेगाने राबविला जात आहे, असेही फडणवीस म्हणाले.
७ लाख कोटींची गुंतवणूक
राज्यातील विकासाचे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील शिवाय रोजगार निर्मिती व विदर्भात उद्योग आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. दोओस येथील परिषदेच्या माध्यमातून विदर्भात सुमारे ७ लाख कोटी रुपयांची गुंवतणूक येणार आहे. गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्याचे विकासचित्र बदलणार आहे. विदर्भाच्या इतरही भागांत उद्योग येणार आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
रस्त्यांचे जाळे विणणार विदर्भात लोकप्रतिनिधी मागणी करतील तेथे रस्ते तयार केले जात आहेत. सध्या तरी विकासासाठी आवश्यक रस्ते तयार होत असून भविष्यातील गरजांनुसार रस्ते विकासाचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
समृद्धी महामार्गाने विकासाला चालना मुख्यमंत्री म्हणाले की, समृद्धी महामार्गामुळे वर्धा जिल्ह्यात विकासाला नवी गती मिळाली आहे. भविष्यात वर्ध्यापासून सुरू होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे आणि सिंदीच्या कोरड्या बंदरामुळे हा जिल्हा मध्य भारतातील लॉजिस्टिक हब म्हणून उदयास येईल. समृद्धीच्या विरुल नोडला लवकरच सरकारकडून मिळेल. यामुळे उद्योगांसाठी एक परिसंस्था निर्माण मान्यता होईल व स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून उदयास येत आहे. येणाऱ्या काळात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर येथील लोहखनिजावर आधारित उद्योगांसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत.