नाशिक – ट्रॅव्हल्स एजंटच्या (Travel Agent) ठकबाजीमुळे मलेशियात (Malaysia) अडकलेले नाशिकचे (Nashik) १५ पर्यटक, भाविक खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या प्रयत्नांमुळे मायदेशी परतले. खासदार गोडसे यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jayshankar), मलेशिया ॲम्बसी प्रशासनाशी पत्रव्यवहार करत मलेशिया पोलिसांच्या (Malaysia Police) कस्टडीतून पंधरा पर्यटकांना सुखरूप मायदेशी परत आणले.
मायदेशी परतलेल्या पर्यटकांनी गुरुवारी खासदार गोडसे यांची कार्यालयात भेट घेतली. सुभाष ओहळे, मीनाक्षी ओहळे, अरुण भदरंगे, शांताबाई भदरंगे, धनाजी जाधव, सुनील म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, अशोक भालेराव, विमल भालेराव, मंदा गायकवाड, वृषाली गायकवाड, प्रवीण नुमाळे, द्रौपदी जाधव, इंदूबाई रूपवते हे सर्व पर्यटक नाशिकला सुखरूप पोचले. खासदार गोडसे यांच्या भेटीवेळी त्यांना गहिवरून आले.
पर्यटकांनी शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंटामार्फत मलेशिया दौऱ्याची आखणी केली होती. एजंट पर्यटकांना नाशिक येथून हैदराबादला घेऊन गेला. एजंटने तेथून १९ पैकी चार जणांच्या व्हिसाचे काम अपूर्ण आहे. तुम्ही विमानाने पुढे चला मी सायंकाळी चौघांना घेऊन मलेशियाला येतो, असे सांगितले.
एजंटने पंधरा पर्यटकांना मलेशियाच्या विमानात बसून दिले. एक दिवस उलटूनही एजंट मलेशियात पोहोचलाच नाही आणि त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यातच मलेशिया पोलिसांनी त्यांना हटकले. पोलिसांच्या प्रश्नांना पर्यटकांकडून योग्य उत्तर न मिळाल्याने पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाली. पोलिसांनी सर्वांचे पासपोर्ट जप्त करत त्यांना क्वॉरंटाइन केले.