कोरेगाव : राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी होऊन नव्याने सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्या पुढाकाराने कोरेगाव नगरपंचायतीस पाहिली भेट म्हणून विविध नागरी विकासकामांसाठी २० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व अपक्ष अशा सुमारे ५१ आमदारांनी बंड केल्यामुळे प्रचंड राजकीय उलथापालथ होऊन महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुखमंत्री होऊन नवीन सरकार सत्तेवर आले. त्यात जिल्ह्यातील तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनीही महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सर्वांनी पाहिले. या भूमिकेचे विकासकामांसाठी निधीच्या रूपात बक्षीस म्हणून नवीन सरकारच्या नगरविकास विभागाने आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे घोडदौड करणाऱ्या कोरेगाव नगरपंचातीस “नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य” या योजनेंतर्गत पाच जुलै २०२२ रोजी २० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
नव्याने मंजूर झालेल्या २० कोटी निधीमधून जवाहर भोसले ते भानुदास बर्गे – फुलाई मंगल कार्यालय परिसरातील रस्त्यांसाठी एक कोटी ७५ लाख, बर्गे घर ते जगताप घर रस्ते काँक्रीटीकरण व गटारसाठी एक कोटी ७५ लाख, प्रभाग क्रमांक एक, दोन, तीन चार व सहामधील रस्त्यांसाठी व गटारसाठी प्रत्येकी एक कोटी ५० लाख, प्रभाग सातमधील रस्त्यांसाठी व गटारसाठी एक कोटी, प्रभाग आठमधील रस्त्यांसाठी ५० लाख, प्रभाग १२ मधील रस्त्यांसाठी एक कोटी, याच प्रभागातील रस्ते व गटार बांधकामासाठी ५० लाख, प्रभाग १३, १४ व १५ मधील रस्ते व गटार बांधकामासाठी प्रत्येकी एक कोटी ५० लाख, प्रभाग १६ मधील ट्रिमीकस काँक्रिट रस्ते व बंदिस्त गटार बांधकामासाठी एक कोटी ५० लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती कोरेगाव नगर विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल बर्गे, कोरेगावच्या नगराध्यक्षा दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष
सुनील बर्गे यांनी दिली.
“कोरेगाव नगरपंचायतीची विकासाची घोडदौड आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दमदारपणे सुरू असून, भविष्यातही शहरवासियांना अधिकाधिक नागरी सोयीसुविधा पुरवण्यासाठी आम्ही नगर विकास आघाडीच्या माध्यामातून कटिबध्द राहू.”
– राजाभाऊ बर्गे, माजी नगराध्यक्ष व अध्यक्ष, कोरेगाव नगरविकास आघाडी.