पुणे : हरवलेले तब्बल २१ मोबाईल लोणीकंद पोलिसांनी परत मिळवून तक्रारदारांना परत केले. मोबाईल राज्यातील विविध शहरातून जप्त केले असून, त्यात बीड, नाशिक, नांदेड व पुण्यातील परिसरातून मिळाले आहेत. यामध्ये महागड्या मोबाईल देखील होते. तक्रारदारांनी हरवलेला मोबाईल पुन्हा परत मिळाल्याने पोलिसांचे आभार मानले.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेकडो नागरिकांनी त्यांचे मोबाईल हरविल्याबाबत तक्रारी नोंदविल्या होत्या. तक्रारींची दखल घेऊन हरवलेले मोबाईल फोन यांचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार यांनी सायबर पथकास दिले होते. त्याअनुषंगाने सायबरचे पथक हरविलेल्या मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणद्वारे शोध घेत होते.
आयएमआए नंबरचा आधार घेऊन शोध सुरू असताना यातील २१ मोबाईल राज्यातील विविध शहरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले. यानूसार, पथकाने या वेगवेगळ्या शहरातून हे मोबाईल जप्त केले. ही कारवाई परिमंडळ चारचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार, गुन्हे निरीक्षक मारूती पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल नुकतेच मुळ तक्रारदारांना पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे व वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार यांच्या हस्ते परत करण्यात आले.