23rd Chhatrapati Shivaji Maharaj Cup Kabaddi Tournament 2024-25 Ahmednagar Pune Rural in Men's Division and Pune Rural in Women's Division in Knockout Rounds
बारामती : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे सुरू असलेल्या २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेत पुरूष विभागात अहमदनगर, महिला विभागात रत्नागिरी, पुणे ग्रामीण संघाने धडक मारली आहे.
अहमदनगर संघाने मारली बाजी
वरिष्ठ पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात पुरूष विभागात ब गटात झालेल्या सामन्यात अहमदनगर संघाने वाशीम संघावर ३८-२१ असा विजय मिळवित बाद फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला अहमदनगर संघाकडे २९-९ अशी आघाडी होती. अहमदनगरच्या राहुल धनावडे व आशिष यादव यांनी आक्रमक खेळ करीत विजय सोपा केला. सौरभ राऊत याने चांगल्या पकडी केल्या. वाशिम संघाच्या शेख अब्दुल शेख गुलाब याने काहीसा प्रतिकार केला. तर रघुनाथ पाटोळ याने पकडी घेतल्या.
पुणे ग्रामीणचा अमरावतीवर शानदार विजय
पुणे ग्रामीण संघाने अमरावती संघावर ४६-२६ असा विजय मिळवित बाद फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे ३२-१२ अशी २० गुणांची आघाडी होती. पुणे ग्रामीण संघाच्या अजित चौहान व शुभम शेळके यांनी चौफेर हल्ला चढवित अमरावतीच्या संघाला प्रतिकार करण्याची संधी दिली नाही. अनुज गावडे व ओमकार लालगे यांनी चांगल्या पकडी घेत विजय सोपा केला. अमरावतीच्या अभिषेक पवार व ऋषिकेश तीवाडे यांनी कडवट प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तर सोमेश अजबले व राजा बेढेकर यांनी काही चांगल्या पकडी केल्या.
रत्नागिरी संघाची अमरावतीवर सरशी
महिलांमध्ये ब गटात रत्नागिरी संघाने अमरावती संघावर ५३-६ असा दणदणीत विजय मिळविला. मद्यंतराला रत्नागिरी संघाकडे ३६-५ अशी निर्मायक आघाडी होती. रत्नागिरीच्या समरिन बुरोंडकर सिध्दी चाळके यांनी चांगला खेळ केला. अमरावतीच्या संघाला मात्र या सामनन्यात कोणतीही चमक दाखविता आली नाही. मध्यंतरा नंतर अमरावती संघाने केवळ एकच गुणाची कमाई केली. अ गटात पुणे ग्रामीण संघाने नागपूर संघावर ५०-२२ अशी मात करीत बाद फेरीत प्रवेश केला. मद्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे ३०-१० अशी आघाडी होती. पुणे ग्रामीणच्या किशोरी गोडसे हिने चौफेर चढाया करीत चांगला खेळ केला. तर वैभवी जाधव, मनशी बनसुडे, सलोनी गजमल यांनी चांगल्या पकडी घेतल्या. नागपूर शहरच्या ईश्वरी मूळणकर हिने चांगल्या चढाया केल्या. तर पूनम शाह हिने पकडी केल्या.