मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीतून भाजपाच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणूकीचा उत्साह ओसरला आहे. मात्र, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवार असल्यामुळे निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी २५६ मतदान केंद्रे असणार आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पोटनिवडणूकीदरम्यान कोणत्याही यंत्रामध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास पर्यायी यंत्रांची व्यवस्था सहजपणे करण्यासाठी सुमारे २० टक्के अतिरिक्त बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आहेत. सुमारे ३० टक्के अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्रांची तजवीज करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान उपयोगात येणारी यंत्रे ही सशस्त्र सुरक्षादलाच्या व कडेकोट बंदोबस्तात आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीत ठेवण्यात आली आहेत.
येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क ज़रूर बजावावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे. निवडणुकीला काही दिवस शिल्लक असून मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन आणि तेथील अधिकारी व कर्मचारी हे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देखील कार्यरत राहणार आहेत.