
वर्षभरात पीक नुकसानीच्या ३ हजार घटना! वन्यप्राणी हल्ले; अनुदान वितरणात वडसा वनविभाग अव्वल
वनांचा जिल्हा म्हणून गडचिरोलीचा राज्यात ओळख आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्याचा कॅरिडोअर म्हणून गडचिरोली वनवृत्तातील वडसा वनविभागाची ओळख आहे. या वनविभागात वन्यप्राण्यांची रेलचेल अधिक असल्यामुळे इतर वनविभागाच्या तुलनेत येथे घटनांही अधिक घडत असतात. अशाही परिस्थितीत शासकीय निकषानुसार घटना घडल्यानंतर त्याचा मोबदला वेळेत देण्यासाठी वडसा वनविभागाने तत्परता दाखविली आहे. वर्षभरात मानवावर हल्ला, पिकांचे नुकसान, पाळीव प्राण्यांवरील हल्ले आदी घटनांतील नुकसान भरपाईची प्रकरणे निकाली काढून संबंधितांना जवळपास ६ कोटी ८३ लाख ८१ हजार ५७० रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आले.(फोटो सौजन्य – istock)
गडचिरोली वनवृत्तात सिरोंचा, आलापल्ली, भामरागड, गडचिरोली व वडसा असे ५ वनविभाग आहेत. यापैकी वडसा वनविभाग वन्यप्राण्यांसाठी कॅरिडोअर असल्यामुळे या वनविभागात सर्वाधिक घटना घडतात. एप्रिल २०२५ ते आजपर्यंत वन्यप्राण्यांचे मानवावरील हल्ल्याच्या २४ घटनांची नोंद झाली. वन्यप्राण्यांमुळे पिकाच्या नुकसानीच्या घटना ३ हजार ३४९ तर पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याच्या ३१७ घटनांची नोंद घेण्यात आली. यातील जवळपास सर्वच प्रकरणाचा निपटारा करून संबंधितांना नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती आहे. वडसा वनविभागांतर्गत येणाऱ्या ८ वनपरिक्षेत्रांपैकी वन्यप्राण्यांचे मानवावरील हल्ल्याच्या सर्वाधिक घटना बेडगाव ७ तर आरमोरीत ६ घडल्या आहेत. यापाठोपाठ मालेवाडा व पोला येथे प्रत्येकी ३ तर देलनवाडी व कुरखेडात प्रत्येकी दोन व वडसा वनपरिक्षेत्रात १ अशा एकूण २४ घटनांचा समावेश आहे. सदर सर्व प्रकरण मंजूर केले असून त्यासाठी वनविभागाने जवळपास १ कोटी ५६ लाख ३० हजारांची नुकसान भरपाईची रक्कम संबंधितांना दिली आहे.
नागझिरात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन! पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी छायाचित्रात टिपला अनमोल क्षण
पाच-सहा वर्षापूर्वी ओडिशातून आलेल्या हत्तीचे बस्तान वडसा वनविभागातील कधी पोर्ला तर कधी आरमोरी वनपरिक्षेत्रात असल्याचे दिसून येते. त्यामुळेच वडसा वनविभागात हत्तीच्या हैदोसाचा सर्वाधिक फटका वनविभागांतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना बसला आहे. तरीही वर्षभरात झालेल्या नुकसानीच्या घटनांपैकी केवळ ४ घटनांचा निपटारा शिल्लक आहे. त्यांचा लवकरच निपटारा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.