नवी मुंबईतील मतदार यादीत ७६ हजार दुबार नावे
नवी मुंबई : नवी मुंबईतील मतदार यादीत ७६ हजार दुबार नावे असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावे वगळण्याची लेखी मागणी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी मा. जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा तथा जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी, ठाणे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे. यावेळी नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्या सदोष असल्याने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात दोन्ही विधानसभा मतदारसंघात जवळपास ७६ हजारांहून अधिक दुबार नावे आहेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४१ हजार ५५६ दुबार नावे आणि बेलापुर विधानसभा मतदारसंघात ३५ हजाराच्या आसपास दुबार नावे आहेत. विशेष म्हणजे ऐरोलीतही तीच नावे व बेलापुरातही तीच नावे आहेत. म्हणजेच सकाळी एकीकडे मतदान करा व दुपारनंतर दुसरीकडे मतदान करा, असा प्रकार होत असल्याचा दाट संशय काँग्रेस ने व्यक्त केला आहे.
७६ हजार मतांपेक्षा अधिक घोळ हे नियोजित षडयंत्र आहे. दुबार नावे मतदारयादीत घुसवून आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवण्याची ही खेळी आहे व त्यासाठीच प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याचा संशय रवींद्र सावंत यांनी आणि माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
दुबार मतदान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली
इतकेच नाही तर जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत ही मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचा आरोप करत वोट चोरी नंतर आता प्रभाग चोरी चा सत्तारूढ पक्षांचा डाव असल्याचे ही रवींद्र सावंत आणि संतोष शेट्टी यांनी सांगितलं.
मतदार यादीत दुबार नावे असणे गुन्हा आहे, त्याचबरोबर दोनदा मतदान करणेही गुन्हा आहे. त्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवेदने देऊन दुबार नावे असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवडणूक विभागाकडून संबंधित दुबार नावे असतील तर सुनावणी घेऊन ती नावे वगळण्यात येतील. मात्र, संबंधितावर गुन्हे हे तक्रारदार यांनी दाखल करावे, असे संबंधितांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता पोलिसांत जर तक्रार गेली तर पोलिस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.