
भंडाऱ्यात 8776 परीक्षार्थी देत आहेत TET परीक्षा; दोन पेपरांसाठी 36 परीक्षा केंद्रे निश्चित
भंडारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (दि.२३) पार पडत आहे. या परीक्षेसाठी भंडारा जिल्ह्यात पेपर १ साठी १५ आणि पेपर २ साठी २१ अशी एकूण ३६ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, दोन्ही पेपरसाठी मिळून ८७७६ परीक्षार्थी आहेत.
प्रवेशपत्रासोबत मूळ आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना किंवा मतदान ओळखपत्र नेणे बंधनकारक आहे. नावात बदल असल्यास राजपत्र, अधिसूचना, विवाह नोंद प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्यक आहे. परीक्षाकेंद्रावर प्रवेशापूर्वी हॅण्ड होल्ड डिटेक्टरद्वारे तपासणी, बायोमेट्रिक नोंदणी आणि फेस रिकग्निशन करण्यात येईल. परीक्षार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास तीस मिनिटे केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर 20 मिनिटांनंतर प्रवेश दिला जाणार नाही. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : शिक्षक पात्रता (MAHA TET) परीक्षाची उत्सुकता; परीक्षा केंद्राच्या 100 मिटर परिसरात बंदीचे आदेश
भंडारा जिल्ह्यात जे. एम. पटेल कॉलेज, नानानी जोशी विद्यालय शहापूर, विनोद विद्यालय सिल्ली, नूतन कन्या विद्यालय भंडारा, जेसीस कॉन्व्हेंट, महर्षी विद्यालय, लालबहादूर शास्त्री विद्यालय, जकातदार विद्यालय, बंसीलाल लाहोटी नूतन, महाविद्यालय, सनी सप्रिंग डेल स्कूल, रॉयल पब्लिक स्कूल, सेंट मेरीज स्कूल, सेंट पिटर्स स्कूल बेला, जि.प. ज्युनियर कॉलेज वरठी, सन फ्लॅग स्कूल वरठी, श्रीमती रेवाबेन मनोहरभाई पटेल कॉलेज, नवप्रभात हायस्कूल वरठी, महेंद्र ज्युनियर कॉलेज, बेला, संत शिवराम महाराज विद्यालय आणि महिला समाज विद्यालय यांचा समावेश आहे.
मोबाईल फोन, कॅमेरावर बंदी
मोबाईल फोन, कॅलक्युलेटर, कॅमेरा, डिजिटल डायरी, कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण, वह्या, पुस्तके किंवा प्रवेशपत्राशिवाय इतर साहित्य घेऊन येण्यास मनाई आहे. परीक्षा सुरळीत आणि निष्पक्ष पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. यात मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन, डी.एड. प्राचार्य राजेश रुद्रकार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिषा गजभिये आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक/योजना) रवींद्र सोनटक्के यांचा समावेश आहे.