आळंदी हादरली! पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल ६६ जणांचा घेतला चावा
पिंपरी : आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत भागीरथी नाल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने दोन दिवसांत तब्बल ६६ नागरिकांना चावा घेतला आहे. पिसाळलेला कुत्रा आळंदीत फिरत असल्याने दोन दिवसांपासून नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आळंदीतील भागीरथी नाल्यावरून ये-जा करीत असताना रविवारी (१५ डिसेंबर) २० जणांना, सोमवारी ( १६ डिसेंबर ) दुपारी दोन पर्यंत ४४ जणांना तर दुपारी दोन नंतर आणखी दोन जणांना कुत्र्याने चावा घेतला. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पिंपरी – चिंचवड महापालिका पशु वैद्यकीय विभागाच्या लोखंडी पिंजऱ्यात कुत्र्यास जेरबंद करून पुढील उपचारास सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, घडलेल्या घटनेमुळे आळंदीतील नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरलेली आहे.
नागरिकांची सुरक्षितता जोपासण्यासाठी मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी विविध सेवाभावी संस्थासह आळंदी शहर भाजपचे संघटन सरचिटणीस भागवत काटकर यांनी केली आहे. काटकर यांनी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे लक्ष वेधले. आळंदी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत प्रतिबंधात्मक लशीकरण करण्यासाठी प्रशासनाने कामकाज करण्याची मागणी करण्यात आली.
मोकाट कुत्र्यांची संख्या मोठी…
आळंदीतील रस्ते, इंद्रायणी नदी घाट, मरकळ रस्ता, चावडी चौक, वडगाव रस्ता, भैरवनाथ चौक आदी ठिकाणी मोठया प्रमाणात मोकाट कुत्रे फिरत असतात. हे कुत्रे नागरिकांचे अंगावर धावून जातात. वडगाव चौक, चावडी चौक, मंदिर परिसर, मरकळ रस्ता, शालेय परिसरात फिरत असलेली मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलनाचा इशारा…
आळंदी नगरपरिषदेने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. पाळीव कुत्र्यांच्या बाबतीतही नगरपरिषदेने धोरण ठरवावे, मोकाट कुत्र्यांचे लसिकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली केली आहे. तसेच तत्काळ कार्यवाही न केल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
आळंदी नगरपरिषद हद्दीतील भागीरथी नाल्यावर ६६ नागरिकांना पिसाळलेला कुत्रा चावला आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांचा यात समावेश आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या नागरिकावर उपचार करण्यात आले आहेत.
– डॉ. उर्मिला शिंदे, वैद्यकीय अधिक्षक, आळंदी नगरपरिषद
पाच जणांना घेतला चावा
दरम्यान गेल्या काही महिन्याखाली दौंड तालुक्यातील पाटस परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणांवर हल्ला करून चावा घेतल्याची घटना घडली. या हल्यात लहान मुलगा, दोन महिला, एक ज्येष्ठ नागरिक हे चौघे जखमी झाले. दरम्यान, या मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा ग्रामपंचायत प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे.