राज्यातील 'या' शहरात घेण्यात आला डीजेमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय; लेझर लाईटही नाहीच
छत्रपती संभाजीनगर : यंदाचा गणेशोत्सव डीजे व लेझरमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय अखेर छत्रपती संभाजीनगर शहरात घेण्यात आला आहे. शहरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरण संरक्षण या तिन्ही बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी व गणेश मंडळांच्या सर्वानुमते या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
मंथन हॉल, एमआयटी कॉलेज येथे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शांतता समिती समन्वय बैठक घेण्यात आली होती. बैठकीत ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात डीजे आणि लेझरचा वापर बंद करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यानंतर पोलिस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये उप आयुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त व ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी मंडळांचे पदाधिकारी तसेच डीजे चालक व मालकांची स्वतंत्र बैठक घेतली. नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
दरम्यान, पोलिस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालयातही बैठक झाली. यावेळी उपआयुक्त (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व प्रभारी अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नियमांचे पालन करावे
बैठकीत पोलिस आयुक्तांनी मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने डीजे व लेझरचा वापर पूर्णपणे बंदी असून उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणारच, असे स्पष्ट केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि ध्वनी प्रदूषण नियमाचा संदर्भ देत, निश्चित डेसिबल मर्यादांचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला.
डीजे मालकावर गुन्हा दाखल
यावेळी नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईही झाली. सातारा पोलीस ठाणे हद्दीत बाहेरून आणलेला डीजे पोलिसांनी ताब्यात घेतला. आरटीओच्या माध्यमातून चालक व मालकावर कारवाई करत तब्बल 35 हजारांचा दंड ठोठावण्यात आला.