
पुण्यात राजकीय घडामोडींना वेग, महाविकास आघाडी एकत्र लढणार? प्रमुख नेत्यांची आज बैठक
महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने १५ डिसेंबरनंतर आचारसंहिता लागण्याची चिन्हे असून, त्यानुसार नव्या वर्षांच्या सुरुवातीला १४ किंवा १५ जानेवारी रोजी मतदान होऊ शकते. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून, रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार का ? या बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची देखील चर्चा होती. मात्र, येणारी निवडणूक ही एकत्रित लढण्याचे स्पष्ट संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले असून, याबाबत पहिली औपचारिक बैठक आज कॉंग्रेस भवन येथे होणार आहे. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांचे पुणे शहरातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी व भरण्यास इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या प्रतिसादाची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पुणे महानगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज देण्याची व स्वीकारण्याची प्रक्रिया येत्या १५ व १६ डिसेंबर या दोन अतिरिक्त दिवसांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, काँग्रेस भवन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जमा करावेत, असे आवाहन पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे.