शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याने काँग्रेस पक्षात केला प्रवेश
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षाचे परभणी जिल्ह्यातील तीन वेळचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. बाबाजानी दुर्राणी यांच्यासह परभणीतील माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, जिल्हा बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक व हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशात दोन विचारधारा असून समतेचा, संविधानाचा सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक विचार आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधान व लोकशाही न माननारा हुकूमशाही व ‘हम दो हमारे दो’, हा विचार आहे. भारताचा व काँग्रेसचा डीएनए एकच आहे. देशात व राज्यात सध्या अराजक पसरलेले आहे, एका उद्योगपतीसाठी देशाला वेठीस धरले जात आहे, तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात धुमश्चक्री सुरु आहे. यातून ‘महाराष्ट्र धर्म‘ वाचवण्याची गरज असून बाबाजानी दुर्राणी यांनी देशाला जोडणारा, महाराष्ट्र धर्म वाचवणारा विचार निवडला आहे. येणारा काळ हा काँग्रेसचा असेल असे सांगून बाबाजानी दुर्राणी यांच्या काँग्रेस प्रवेशाने परभणी जिल्हा व मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले की, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. दुर्राणी हे लोकनेते आहेत, त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला उज्ज्वल भविष्य आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरु झाले असून यापुढे काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी रांगा लागतील, असेही अमित देशमुख म्हणाले.
बाबाजानी दुर्राणी यावेळी म्हणाले की, भाजपा युती सरकारमध्ये अल्पसंख्याक, ओबीसी व मागासवर्गीय समाज सुरक्षित नाही. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे आणि मी व माझे सहकारीही याच विचाराचे आहोत. काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा असून, देशात आगामी काळात काँग्रेस व भाजपा हे दोनच पक्ष राहतील असे दुर्राणी म्हणाले. तसेच परभणी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष एक नंबरचा करु, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नागपूर शहर उपाध्यक्ष शिव लिलाधर बेंडे, नागपूर अल्पसंख्याक सेलचे NCP (SP) अध्यक्ष रिजवान अन्सारी, नागपूर शहर जिल्हा प्रवक्ता संतोष सिंह, भारतीय कामगार सेना नागपूर जिल्हा अध्यक्ष राजेश रंगारी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नागपूरचे माजी महानगर अध्यक्ष श्याम चौधरी व मुंबईतील मालाडचे मनसेचे नेते राजेश नंदनवार यांनीही समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या कार्यक्रमाला माजी मंत्री अमित देशमुख, काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व परभणीचे निरीक्षक, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व परभणीचे निरीक्षक अतुल लोंढे, प्रा. यशपाल भिंगे, किशोर कान्हेरे, माजी खासदार हुसेन दलवाई, परभणी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शफी इनामदार, बाळासासाहेब देशमुख, आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या नवनियुक्त तालुका अध्यक्षांच्या शिबीराचे उद्घाटन
काँग्रेस पक्षाचे नवनुयिक्त तालुका अध्यक्ष यांच्या दोन दिवसाच्या शिबीराचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते झाले. हे शिबीर दोन दिवस चालणार असून उद्या दुपारी ४ वाजता या शिबिराचा समारोप असेल. पक्ष संघटना वाढवणे, आगामी निवडणुका तसेच विविध मुद्द्यांवर यावेळी उहापोह होत असून विविध क्षेत्रातील वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.