नागपूर : तीन मित्र कारने फिरायला निघाले. कारचा स्पीड अत्याधिक असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर कार चालक तरुण गंभीर आहे. अपघाताची ही दुर्दैवी आणि भीषण घटना अंबाझरी बायपास मार्गावर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
प्रणय रामेश्वर किलनाके (वय 22) आणि गौरव दशरथ पेंदाम (वय 23, दोन्ही रा. गोंड मोहल्ला, शोभाखेत) अशी मृतांची नावे आहेत. जखमी लिकांत कोमल कुलसुंगे (वय 23) वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लिकांतचे टेकानाका परिसरात लॉकडाऊन कॅफे आहे. शनिवारी रात्री त्याने मित्र गौरव आणि प्रणय यांच्यासोबत मिळून फिरायची योजना आखली. तिघेही (एमएच 49/बीडब्ल्यू-0749) क्रमांकाच्या कारने फुटाळामार्गे अंबाझरी बायपास रोडने हिंगणा टी-पॉईंटकडे जात होते.
अंबाझरी उद्यानाच्या गेटसमोर उतरावर वाहन भरधाव होते. दरम्यान लिकांतचे स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटले. कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की, कारचा समोरचा भाग पूर्णतः चक्काचूर झाला होता. मोठा आवाज झाल्याने आसपासच्या नागरिकांची झोप उघडली.