पुण्यातील 'या' भागात गॅस टँकर पलटी; वाहनांच्या लांबच लांब रांगा
पुणे : मुंबई – बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील वारजे ओव्हर ब्रिजजवळ एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र टँकर रस्त्यात पूर्णपणे आडवा झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याचा फटका तब्बल साडेचार ते पाच तास रस्त्यावर कोंडी झाली होती. अखेर साडेचारच्या सुमारास पाच क्रेनच्या माध्यमातून टँकर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही.
इण्डेन कंपनीचा एलपीजी गॅस भरलेला टँकर मुंबईहून सातार्याच्या दिशेने निघालेला होता. साडेदहाच्या सुमारास वारजे ओव्हर ब्रीजजवळील टाटा मोटर्स शोरूमसमोर आल्यानंतर टँकर पलटी झाला. ड्रायव्हर केबिनसह पुढचा भाग थेट समोरील ट्रॅकवर घुसला. सुदैवाने समोरच्या बाजूने येणारे कोणतेही वाहन त्यावेळी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातात कोणी जखमी नाही. मात्र, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. टँकर आकाराने मोठा होता. त्यामुळे ये जा करण्यास अडचणी येत होत्या. या घटनेमुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. टँकर भरलेला असल्याने तो हटविण्यासाठी मर्यादा येत होत्या. या दरम्यान वाहनधारकांना पर्यायी मार्गावरून वळविण्यात आले. पण, अचानक झालेल्या या घटनेने वाहनधारकांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. महामार्गावर चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. मुख्य मार्ग जाम झाल्याने सेवा रस्त्यांवर देखील वाहनांची वर्दळ वाढून कोंडी झाली होती. अखेर साडेचारच्या सुमारास पाच क्रेन आणून संबंधीत टँकर सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आला. त्यानंतर काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. समोरील वाहनाचा वेग अचानक कमी झाल्याने टँकर चालकाकडून नियंत्रण सुटूून अपघात झाला असावा, असा अंदाज आहे. वारजे पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : सदाशिव पेठेत भरदुपारी फ्लॅट फोडला; अमेरिकन डॉलर चोरले
टेम्पोने तिघांना उडविले
पुण्यासह राज्यभरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली सातारा-पुणे महामार्गावरील मांगडेवाडी गावाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला पतीसह मैत्रिणीशी गप्पा मारत उभा असताना भरधाव पॅगो टेम्पोने उडविले. या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर दाम्पत्य जखमी झाले आहेत. दिपाली वैभव बर्गे (वय ४५) अशी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, आदीनाथ वायदंडे (वय ५९) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पार्वती वायदंडे (वय ५०) यांनी तक्रार दिली आहे. ९ नोव्हेंबर रोजी पावणे आठच्या सुमारास हा अपघात घडला आहे.