सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, सदाशिव पेठेत भरदुपारी अवघ्या पाऊण तासात बंद फ्लॅट फोडत १८०० अमेरिकन डॉलर चोरून नेले आहेत. या सोबतच मुकूंदनगरमध्ये देखील फ्लॅट फोडण्यात आला आहे. दोन घटनांत चार लाखांचा ऐवज चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडण्याचा धडाका लावला असून, या चोरट्यांचा थांगपत्ता मात्र पोलिसांना लागत नसल्याचे दिसत आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार या सदाशिव पेठेतील सिद्धी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत राहण्यास आहेत. दरम्यान, त्या काही कामानिमित्त दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील १ लाख ५१ हजार रुपयांचे १८०० अमेरिकन डॉलर चोरून नेले. तक्रारदार या दुपारी १ वाजण्याच्या सुमारास परत आल्या असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
मुकूंदनगरमध्ये अडीच लाखांची घरफोडी
मुकूंदनगर परिसरात बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी दोन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना देखील समोर आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात २८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. तक्रारदार हे मुकूंदनगर येथील चाफेकर रोडवरील केदार रेसेडन्सी या इमारतीत राहण्यास आहेत. ते २० नोव्हेंबर रोजी कुटूंबियासह घराला कुलूप लावून गेले होते. तेव्हा चोरट्यांनी कुलूप उचकटून घरातील अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार हे शनिवारी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.