नदी पार करताना पाय घसरला अन्...; काळू धबधब्याजवळ तरुणाचा थरारक बचाव
ओतूर : जुन्नर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काळू धबधब्याजवळ एका तरुणाचा थरारक बचाव करण्यात आला आहे. माळशेज परिसरातील सागनोरे येथे काळू धबधब्याजवळ पुण्याहून चार पर्यटकांना घेऊन आलेला ड्रायव्हर काळू नदीत सेल्फी घेण्याच्या नादात पाण्याच्या प्रवाहात पडून वाहू लागला होता. मात्र, स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
दरम्यान याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माळशेज घाट परिसरातील काळू धबधबा या ठिकाणी एक तरुण धबधब्याच्या टोकावर सेल्फी घेण्यासाठी गेला असताना तोल जाऊन तो पाण्यात पडला होता. अचानक पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आणि तो थेट धबधब्याच्या मध्यभागी अडकून पडला. विशेष म्हणजे, त्याच्या खाली होती २०० ते ३०० फूट खोल दरी आणि काही क्षणांची चूक झाली असती तर हा तरुण वाहून गेला असता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
निसर्गरम्य जुन्नर तालुक्यात सध्या पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली आहे. धबधबे, निसर्गरम्य रानवाटा, हिरवीगार डोंगरदऱ्या आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र, पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिंपळगाव जोगा धरणाच्या जवळ असलेल्या काळू नदी परिसरात पुण्याहून आलेले चार पर्यटक फिरत होते. त्यांच्यासोबत असलेला ड्रायव्हर नदी पार करण्याच्या प्रयत्नात सेल्फी घेत होता. नदी पार करताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो नदीत पडला.
नदीचा प्रवाह प्रचंड वेगाने वाहत असल्यामुळे तो वाहू लागला. प्रसंगावधान राखून त्याने नदीतील एका मोठ्या दगडाचा आधार घेत स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तेथील पर्यटकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. जवळच असलेल्या स्थानिक व्यावसायिक तुषार मेमाणे, संदीप साबळे आणि त्यांचे इतर सहकारी मदतीला धावले. त्यांनी तात्काळ आपल्या जवळील स्कार्फ आणि शाली एकत्र बांधून बुडणाऱ्या ड्रायव्हरकडे फेकली, आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवला. अशा घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हे सुद्धा वाचा : कराडमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण; नेमकं काय घडलं?