संग्रहित फोटो
कराड : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे, लूटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता कराड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वारुंजी (ता. कराड) येथे जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरुन झालेल्या मारामारीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी दुपारी वारुंजी येथे हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलीस कर्तव्य बजावित असताना सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करून शिवीगाळ, धक्काबुक्की करुन मारहाण केल्याचा गुन्हा पाच जणांवर दाखल केला आहे. अंकुश श्रीपती पाटील, प्रमोद अंकुश पाटील, धनाजी श्रीपती पाटील, शिला अंकुश पाटील, मंदाकिनी धनाजी पाटील (सर्व रा. वारुंजी, ता. कराड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वारुंजी येथील जयवंत शंकर गुरव यांच्या मिळकतीत वहिवाटीबाबत हरकत अडथळा होत असल्याने पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस कर्मचारी किशोर पंडित तारळकर, सोनाली पिसाळ, गायकवाड बंदोबस्तासाठी वारुंजीत गेले होते. त्यावेळी अर्जदार यशवंत गुरव, शशिकांत विलास गुरव, मोहन शंकर गुरव हे तेथे हजर होते. प्रमोद अंकुश पाटील तेथे आला व त्याने शशिकांत गुरव यांना संबंधित मिळकतीचा दावा न्यायालयात सुरु असून तुम्ही येथे येऊ नका, असे सांगितले. त्यावेळी शशिकांत गुरव यांनी त्यांना दिवाणी न्यायालयाने दिलेली आदेशाची प्रत दाखवली. त्यावरुन त्यांचा वाद झाला. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी आपसात भांडू नका, असे सांगितले.
त्यादरम्यान अंकुश पाटील याने पत्र्याच्या शेडमधून शशिकांत गुरव यांना अचानक दगड मारला. त्यावेळी शशिकांत गुरव व अंकुश पाटील यांच्यात मारामारी झाली. त्या दरम्यान प्रमोद पाटील याने शशिकांत गुरव यांच्याबरोबर वाद घातला. त्यावेळी पोलीस कर्मचारी गायकवाड, सोनाली पिसाळ त्यांचा वाद सोडवण्यास गेल्यावर अंकुश पाटील याने गायकवाड य़ांना शर्टाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. त्याचवेळी धनाजी श्रीपती पाटील शेडमध्ये गेले. त्यावेळी शीला अंकुश पाटील व मंदाकिनी धनाजी पाटील या तेथे आल्या. पोलिसांना शिवीगाळ करु लागल्या. त्यामुळे पोलिस कर्मचारी तारळकर भांडणे सोडविण्यासाठी गेले असता अंकुश पाटील याने त्यांनाही दगड मारुन जखमी केले. तर शीला अंकुश पाटील व मंदाकिनी धनाजी पाटील यांनी महिला पोलिस कर्मचारी सोनाली पिसाळ यांना धक्काबुक्की केली. संबंधित पाच जणांविरोधात सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करून शिवीगाळ, धक्काबुक्की करुन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.