चंद्रभागेच्या तीरी उसळला लाखोंचा पांढरा जनसागर
पंढरपूर / नवनाथ खिलारे : चंद्रभागेच्या तिरी…पाहा मंदिरी तो पहा विटेवरी…विठ्ठल विठ्ठल जयहरी…दुमदुमली पंढरी…पांडुरंग हरी तो पहा विटेवरी…विठ्ठल विठ्ठल जयहरी…असेच काहीसं चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या श्री विठ्ठलाची ओढ महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाविकाला असते. त्यातच आपल्या लाडक्या विठुरायाचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे आषाढी एकादशीचा सोहळा होय. याच दिवशी देहूवरून संत तुकाराम महाराज, आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराज यासह अनेक संत मंडळींच्या पालख्या पंढरीनगरीत विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आज हाच आषाढीचा भव्य असा सोहळा पंढरपुरात पार पडला. यावेळी आषाढी वारीसाठी सुमारे 20 लाख भाविक दाखल झाले होते.
अंगामध्ये पांढऱ्या कपड्यांचा पोशाख परिधान करत लहान-थोर सर्वच मंडळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीनगरीत दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. सर्व भेदभाव विसरून जातीपाती संपवून एकमेकांच्या पाया पडत हरी नामाच्या गजरात पंढरी नगरीत हा दिव्य असा सोहळा पार पडला.
यंदा नव्हते पावसाचे सावट
यंदा आषाढीवर पावसाचे सावट नसल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी पंढरीनगरीत दाखल झाले होते. यामुळे पंढरीनगरीत जणू भक्तांचा महापूर पाहायला मिळाला. मागील आषाढी वारीच्या तुलनेत यावर्षी 25 ते 30 टक्के वारकरी संख्या वाढलेली दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र एक भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका सदैव फडकवत ठेवत असून, अशा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासन सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे.
शासनाकडून वारकरी महामंडळाची स्थापना
शासनाने वारकरी महामंडळाची स्थापना केली असून, वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासनाला आषाढी वारीनिमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्येही तिपटीने वाढ करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
स्थानिक व्यावसायिकांकडून कोट्यवधींची उलाढाल
आषाढी वारीनिमित्त स्थानिक उद्योगाच्या माध्यमातून शेकडो कोटींची उलाढाल यावेळी झाली आहे. स्थानिक व्यवसायामधील हळदीकुंकू, बुक्का विक्री, पेढा विक्री, अगरबत्ती यासह पंढरीतील प्रसिद्ध असणाऱ्या चुरमुरे, घोंगडी यांसारख्या अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांमधून शेकडो कोटींची उलाढाल आषाढी वारीच्या निमित्ताने पाहायला मिळाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीत दाखल होणारे भाविक मोठ्या भक्ती भावाने बुक्का, कुंकू यासह पंढरीच्या पेढ्याला मोठी पसंती देतात. त्यामुळे या व्यवसायांमधील उलाढाल ही मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले.