मनसे-शिवसेना युतीवर आबू आझमींचे मोठे विधान; म्हणाले, ' राज अन् उद्धव एकत्र आले तर मला...'
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच घरात जन्माला आले आहेत. दोन भाऊ एकत्र आले तर त्यात आम्हालाही आनंदच आहे. मात्र राज ठाकरेंची स्वत:ची ताकद नाही. ते फक्त द्वेषाचं राजकारण करतात. दररोज परप्रांतिय किंवा उत्तर भारतीयांविरोधात बोलणं हाच त्यांचा धंदा आहे. राज आणि उद्धव एकत्र आले, तर शिवसेनेची ताकद कमी होऊ शकते, असा दावा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी केला आहे.
येत्या ३-४ महिन्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक येणार असल्याच्या चर्चा आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य निर्णय घेतला जाईल, असं म्हणत युतीचे संकेत दिले आहेत. मात्र राज ठाकरेंकडून अद्याप युतीबाबत कोणतंही विधान करण्यात आलेलं नाही.
विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात राज ठाकरेंनी उमेदवार दिले होते. त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या काही उमेदवारांना झाल्याचं माणलं जातं. त्याअनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये दोन्ही बंधू युती करतील, असं सांगितलं जातं आहे.
उद्धव ठाकरेंच्या गोटातून काही वरिष्ठ नेत्यांचं याला समर्थन असलं तरी राज ठाकरेंचे काही नेते युतीच्या विरोधात असल्याचं पहायला मिळतं आहे. काही ठकाणी मनसे आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचे एकत्र फलक झळकले आहेत. तर काहींनी उघड उघड पाठिंबा दर्शवला आहे. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? हे येणारा काळच ठरवणार आहे.
Raigad News : “भाजपसोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली; भाजप माजी जिल्हा उपाध्यक्षांचा शिंदेसेनेत प्रवेश
त्यातच अबू आझमी यांनी केलेलं विधान मनसेसाठी चिंतेचा विषय आहे आणि त्यावर चर्चाही सुरू झाली आहे. कारण, दोन्ही नेते एकत्र आले तर त्याचा मनसेला किती फायदा होईल हे सांगता येणं कठीण आहे. सध्या शिवसेनेची ताकद कमी झाली असली तरी मनसेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. जर दोन्ही नेते एकत्र आले तरी त्याचा फायदा शिवसेनेलाच होण्याची दाट शक्यता आहे. तरीही युती होणार की नाही आणि झालीच तर त्याचा फायदा कोणाला होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.