फोटो सौजन्य:गुगल
अलिबाग : आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांमध्ये पक्ष प्रवेशाची चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, भाजपमध्ये आणि महायुतीतील प्रमुख घटक पक्षात येऊन सत्तेसोबत जाणेच अनेकजण पसंत करत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटातील सुधाकर बडगुजर यांनी भाजपात (BJP) प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता, विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी करत दिलीप भोईर यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढल होती. मात्र, बंडखोरी करणाऱ्या भोईर यांनी आज मंत्री भरत गोगावले (Bharat gogawale) यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भोईर यांनी पक्ष प्रवेश केला. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपात येथील जागा शिवसेनेला गेल्याने दिलीप भोईर यांची निराशा झाली. त्यानंतर, भोईर यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला.
भोईर यांनी विधानसभा निवडणुकीत 33 हजार मतं घेत महायुतीच्या व शेकापच्या उमेदवारांना आव्हान दिलं होतं. मात्र, त्यांना पराभव पत्कारावा लागला असून येथून शिंदेंच्या शिवसेनेचे महेंद्र दळवी विजयी झाले आहेत. दिलीप भोईर हे अलिबागमधील भाजप नेते होते, मात्र त्यांनी बंडखोरी करत विधानसभा लढवली. त्यानंतर, भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. आता, त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. विशेष म्हणजे भाजप महायुतीतील पक्ष असूनही भाजपमधून निवडणूक लढवलेल्या दिलीप भोईर यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यामुळे, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची ताकद अधिक मजबूत होणार असून दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाला मात्र भविष्यात अलिबागमधून मोठं आव्हान असणार आहे.
माझ्याकडे गोरगरिब जनता भेटायला येते. त्यामुळे मी कधीही सकाळी, कोणीही भेटायला आले की त्यांना भेटताना मी शर्ट न घालता टॉवेलवरच कधी कधी भेटायला येतो. माझ्याकडे येणारी जनता ही गोरगरिब असते, त्यांच्या मदतीसाठी मी कोणत्याही वेळी भेटत असतो, असे स्पष्टीकरणच मंत्री भरत गोगावले यांनी व्हायरल व्हिडिओवर दिले आहे. विरोधकांनी अघोरी विद्येचा बाहेर काढलेला मंत्री भरत गोगावले यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर, सोशल मीडियातूनही त्यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली. आता, गोगावले यांनी अलिबागमधील भाजपचे दिलीप भोईर यांचा पक्ष प्रवेशावेळी आपल्या भाषणात विरोधकांवर मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.