संभाजीनगरमध्ये मंदिरासमोरच भीषण अपघात; कारने सहा जणांना चिरडले
छत्रपती संभाजीनगर : शहरातील काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला, तर पाच पादचारी गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि.4) सकाळी सव्वा आठच्या सुमारास झाला. भरधाव आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने पादचाऱ्यांना चिरडत थेट मंदिराच्या पायऱ्यांवर धडक दिली. या अपघातात गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे (वय ७०) यांचा मृत्यू झाला.
शेवाळे हे मंदिरात गेल्या १५ वर्षांपासून सेवा बजावत होते. या अपघातात दिगंबर तौर (वय ४५), मनिषा समधाने (वय ४०), विकास समधाने (वय ५०), रवींद्र चौबे (वय ६५), आणि श्रीकांत राडेकर (वय ६०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर एमजीएम, ईएसआयसी व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केल्यामुळे काहींना वेळीच रुग्णालयात हलवता आले. अपघातास कारणीभूत ठरलेला चालक प्रशांत एकनाथ मगर (पय ३०, रा. सिडको) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याची कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ब्रेकऐवजी दाबला एक्स्लरेटर
प्रशांत मगर हा उस्मानपुरा येथे खासगी शिकवणी घेतो. तो सकाळी गारखेडा क्रीडा संकुलात टेनिस खेळून घरी परतत असताना पिरॅमिड चौकातून सर्व्हिस रोडने जात होता. त्यावेळी गतिरोधक ओलांडल्यानंतर समोरून येणाऱ्या कारकडे लक्ष गेल्याने त्याने घाबरून ब्रेकऐवजी एक्स्लरेटर दाबला. परिणामी, गाडी भरधाव वेगाने मंदिराच्या दिशेने धावली आणि समोरील पादचाऱ्यांना उडवले.
सराव नसल्याने कारवरील नियंत्रण सुटले
प्रशांत मगरने २२ मे रोजी नवीन ऑटोमेंटिक कार घेतली होती. ऑटोमॅटिक कार चालवण्याचा पुरेसा सराव नसल्यामुळे नियंत्रण सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले की, प्रशांत नेहमीच कार भरधाव वेगाने चालवत असल्याची चर्चा परिसरात होती. दरम्यान, मंदिराशेजारील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेले पवार यांनी थरारक अनुभव कथन केला.