पाटस : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ (ता.दौंड) एमआयडीसीजवळ दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात (Accident in Patas) झाला. या अपघातात एक जण जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रामदास कृष्णा झगडे (वय ७०, रा.सिद्धेश्वर निंबोडी) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर जखमीमध्ये एका महिलेचा समावेश आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ एमआयडीसी चौकात हा अपघात झाला. पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या कारने महामार्गावरील लोखंडी बॅरेकेट तोडून दुभाजकाच्या पलीकडे जाऊन सोलापुरहून पुण्याला जाणाऱ्या कारवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कुरकुंभ पोलीस चौकीचे पोलीस हवालदार शंकर वाघमारे, श्रीरंग शिंदे, पोलीस मित्र स्वप्नील कांबळे, मंगेश भगत, इरफान शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलीसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अपघातातील जखमींना वाहनांमधून बाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आली.






