धक्कादायक ! फटाके फोडण्यास रोखल्याने तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; वाढदिवस साजरा करण्यास एकत्र आले अन्... (संग्रहित फोटो)
विशेष म्हणजे, याच वेळी बजाजनगर पोलिसांचे पथक परिसरातील एका शोरूमला लागलेली आग आटोक्यात आणण्याच्या व्यवस्थेत व्यस्त होते. या हत्येची दखल घेत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बजाजनगरचे ठाणेदार चेतनसिंह चौहान यांना तातडीने पोलिस मुख्यालयात पाठवले. ही घटना रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास देवनगर चौकात घडली. अक्षय मडावी (वय २८, रा. नीलकमल अपार्टमेंट, जुना फुटाळा), सुजल ऊर्फ वॅक्स शेडाम, आदित्य ऊर्फ आदि कळसकर आणि समीर कावळे (रा. गिट्टीखदान), अशी आरोपींची नावे असून, पोलिसांनी रात्री उशिरा त्यांना अटक केली.
अक्षय मडावी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. सुजल आणि समीर यांचाही पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास असल्याचे सांगितले जाते. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र
देवनगर येथील प्रसाद राऊत याचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवसाचा केक कापण्यासाठी त्याने मित्रांना बोलावले होते. दिवाळी साजरी केल्यानंतर अमन हा मित्र अक्षय नौकरकर आणि अन्य मित्रांसह देवनगर येथे पोहोचला. याच परिसरात अक्षय मडावीही आपल्या साथीदारांसह आला होता. त्यामुळे चौकात सुमारे ३० ते ४० तरुण जमले होते.
शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत
अमनने आपली कार चौकात उभी केली असताना अक्षयच्या साथीदारांपैकी एकाने कारसमोर फटाके फोडण्यास सुरुवात केली. फटाक्यांमुळे कारला आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन अमनने त्याला फटाके फोडण्यास मनाई केली. यावरून आरोपीनी अमनशी वाद घातला. आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याने शाब्दिक वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले.
अक्षयने केले पोटावर चाकूने वार
भूषण खुरसुंगे याने मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यालाही धक्काबुक्की केली. अमनच्या बाजूने काही जण पुढे येत असल्याचे पाहून अक्षय मडावीने चाकू काढला. उपस्थितांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र, त्याचदरम्यान अक्षयने अमनच्या पोटावर चाकूने वार केला. अमन रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. या झटापटीत अन्य काही जणांनाही किरकोळ दुखापत झाली. अक्षय आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अमनला मित्रांनी तातडीने शासकीय मेडिकल दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
FAQ
1. नागपूरमध्ये तरुणाची हत्या कशामुळे झाली?
फटाके फोडण्यास विरोध केल्यामुळे झालेल्या वादातून तरुणाची हत्या झाली.
2. मृत तरुणाचे नाव काय आहे?
अमन ऊर्फ बॉबी सपाटे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे.
3. ही घटना कुठे घडली?
नागपूरमधील देवनगर चौकात ही घटना घडली.






