
राजगुरूनगर : पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway) शिरोली (ता. खेड) येथील खरपुडी फाट्यावर भीषण अपघात (Accident in Kharpudi) झाला. या अपघातात पुण्याकडून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या 18 महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच महिला रस्त्यावर पडून चिरडल्या गेल्या. यातील दोन जागीच ठार झाल्या, तर तीन महिलांचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. यात 13 महिला गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले व पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.
शोभा राहुल गायकवाड, सुनंदा सटवा गजेशी (वय 62, रा. कात्रज), सुशीला वामन देढे (वय 70, रा. रामटेकडी), इंदुबाई कोंडीबा कांबळे (वय 47, रा. किरकटवाडी), राईबाई पिरप्पा वाघमारे (वय 55, रा. रामटेकडी, पुणे ) असे अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. यातील तीन महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित महिलांना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी दिली.
लग्नात वाढपी कामासाठी आल्या होत्या महिला
खरपुडी रस्त्यावर एका कार्यालयात लग्नाच्या कार्यक्रमात जेवण बनवून वाढपी काम करण्यासाठी 18 महिला या पुण्यातील स्वारगेट, खडकवासला, किरकटवाडी, रामटेकडी परिसरातून पीएमपीएल बसने आल्या होत्या. त्या रस्ता ओलांडत असताना पुण्याच्या बाजूने वेगात आलेल्या महिंद्रा एक्सयूव्ही जीपने 18 महिलांच्या घोळक्यातील 8 महिलांना जोरदार धडक दिली. यात पाच महिला वाहनाच्या धडकेत रस्त्यावर पडून चिरडल्या गेल्या. त्यातील दोन जागीच ठार झाल्या. एका महिलेचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
चालक न थांबता पसार
मंगळवारी पहाटे एका महिलेचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. तर सारिका देवकर, वैशाली लक्ष्मण तोत्रे व शोभा सुभाष शिंदे अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. घाबरलेल्या चालकाने ती दुभाजकावरून फिरवून पुन्हा दुसऱ्या बाजूने पुण्याच्या दिशेने धूम ठोकली. पोलिसांनी या वाहनाचा शोध घेतला. मात्र, अद्याप तपास लागला नसल्याचे भोसले यांनी सांगितले.