नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई; कोटीचा दंड वसूल
बारामती : बारामती शहरातील टीसी कॉलेज परिसरात वाहतूक नियमांचे सातत्याने होणारे उल्लंघन रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तीन दिवसांची विशेष मोहीम राबवून १०७ वाहनचालकांवर कारवाई करत तब्बल १,०५,५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. १२, १३ आणि १५ जुलै २०२५ रोजी ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान ट्रिपल सीट, अतिवेग, काळ्या काचा, चुकीच्या अथवा नंबर नसलेल्या नंबर प्लेट्स, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर अशा अनेक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
कारवाईदरम्यान काही वाहनचालक पोलीस थांबवण्याचा इशारा झुगारून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये एम.एच.४२ बी.ई. १०६२ – लाल रंगाची स्विफ्ट कार (काळ्या काचा व चुकीची नंबर प्लेट) : माळेगाव पोलिसांच्या मदतीने ताब्यात, एम.एच.४२ बी.एच.६६८९ – बुलेट: चुकीच्या नंबर प्लेटसह फिरणारी ही बुलेट दीड वर्षांपासून शोधात होती. एम.एच.४२ बी.आर.११२५ – यमाहा : मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरसह नियम मोडणारी. एम.एच.४२ बी.एल.७२९४ – स्प्लेंडर प्लस : नंबर प्लेटविना फिरताना आढळली. ही सर्व वाहने सध्या बारामती वाहतूक शाखेकडून ताब्यात घेण्यात आली. याशिवाय अनेक वाहनांवर अनुशंगिक कारवाई करण्यात आली आहे.
उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे फोटो, व्हिडिओ पाठवा
“विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी अशा मोहीमा आवश्यक आहेत. या प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहतील. कोणत्याही नागरिकाने वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनांची माहिती ९९२३६३०६५२ या क्रमांकावर फोटो किंवा व्हिडिओसह पाठवावी, कारवाई केली जाईल,” असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक सुभाष काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विशेष पथकाने केली. कारवाईसाठी शीघ्र कृती दलाचे १४ जवान, तसेच महिला पोलिसांचा सक्रिय सहभाग होता.