
रायगड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला (Raigad Shivrajyabhishek Sohala) 350 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं तिथीनुसार किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), छत्रपती शिवरायांचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले, (Udayraje Bhosale) छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा किल्ले रायगडावर साजरा करण्यात आला.
सकाळी सातच्या सुमारास ध्वजारोहण सोहळा पार पडला. सकाळी 9 च्या सुमारास शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. छत्रपती शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदयनराजे भोसले या कार्यक्रमाला उपस्थित होते. गागाभट्ट यांचे 17 वे वंशज यांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात हा सर्व सोहळा पार पडला. विधिवत शिवरायांची पूजा आणि आरती करण्यात आली. शिवछत्रपतींना तोफांची सलामीही देण्यात आली. सकाळी 10.30 वाजता शिवसन्मान सोहळा पार पडला. त्यानंतर सकाळी 11 च्या सुमारास रायगडावर शिवपालखी सोहळा रंगला. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याप्रमाणेच सर्व संस्कार करण्यात येत आहेत.
गुरुवारी शिर्काईमातेच्या पूजनानं कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर रायगडावरील गंगासागर तलाव आणि विविध देवदेवतांचं पूजन करण्यात आलं. शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं रायगडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं.
या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर प्रचंड गर्दी उसळलेली आहे. शिवप्रेमी तळपत्या उन्हातही छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येनं रायगडावर दाखल झालेले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात आपल्या छत्रपतींना मानवंदना देण्यात येते आहे. जय भवानी-जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी किल्ले रायगड दुमदुमून गेला आहे.