
Iqbal Singh Chahal, Mumbai Police Housing Township, Police Staff Quarters, Urban Development Maharashtra,
Iqbal Singh Chahal News: राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंह चहल येत्या ३१ जानेवारी निवृत्त होत आहे. पण या निवृत्तीपूर्वीच राज्य सरकारने त्यांच्यावर एक नवी जबाबदारी सोपवली आहे. इकबाल सिंह चहल यांची मुंबई पोलीस गृहनिर्माण टाऊनशिप प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून निवृत्तीनंतर लगेचच ते या पदाची सुत्रे स्वीकारणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पदासह चहल यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जाही देण्यात येणार आहे. इकबाल चहल हे यापूर्व मुंबई महापालिकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. प्रशासकीय क्षेत्रात गेल्या ३६ वर्षांचा कामाचा अनुभव आहे.
राजकीय घडामोडींना वेग, महापौर पदासाठी टोकाची स्पर्धा; कोल्हापूरकरांचे लक्ष मुंबईकडे
राज्य सरकारने मुंबई शहर आणि उपनगरातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ४५ सरकारी निवासस्थाने बांधण्याच्या ‘मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पांतर्गत सुमारे ५ कोटी चौरस फूट क्षेत्राचा विकास केला जाणार आहे.
या भव्य प्रकल्पासाठी २० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील ३० टक्के निधी सरकार देणार असून, उर्वरित ७० टक्के निधी MSIDC मार्फत विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात उभारला जाईल. सध्या हा प्रकल्प सुरू करण्यासाठी महामंडळाला १०० कोटी रुपयांच्या प्राथमिक निधीची मंजुरी देण्यात आली आहे.
सध्याच्या सरकारमध्ये निवृत्तीनंतर मंत्रिपदाचा दर्जा मिळवणारे ते दुसरे सनदी अधिकारी ठरणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी प्रवीण परदेशी यांना हा मान मिळाला असून, त्यांची ‘मित्रा’ (MITRA) संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशी यांची मुदत २२ फेब्रुवारी २०२६ रोजी संपणार होती, परंतु त्यांना या पदावर आता तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
याशिवाय परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही नियुक्ती करण्यात आली असून, ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्षही आहेत. याआधी ठाकरे सरकारनेही सीताराम कुंटे यांना निवृत्तीनंतर लगेचच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. यावरून सरकार कोणतेही असले तरी, सनदी अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी विविध मार्गांनी त्यांच्या नियुक्त्या केल्या जातात, हे स्पष्ट होते.