BJP
जळगाव : लोकसभा व रावेर लोकसभा मतदारसंघात (Political News) यंदा प्रथमच चुरस निर्माण झाली होती. कार्यकर्त्यांचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपमध्ये (BJP) संघटनात्मक ताकद विखुरल्याने निवडणुकीदरम्यान समन्वयाचा अभाव असल्याचे पक्षातील पदाधिकारीच बोलताना दिसले. त्याचा फायदा विरोधकांना होताना दिसत होता.
पक्षांतर्गत चढाओढ, वर्चस्वाची लढाई, नाराजीनाट्य रंगल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेपासून दिसले होते. या सर्व घडामोडींची जाणीव झालेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आगामी धोका लक्षात घेत बदलाचे संकेत दिले. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर व महानगराच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांची गेल्या वर्षी जुलैत नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर दीड महिन्यांनी कार्यकारिणी जाहीर झाली होती.
दरम्यान, सुरूवातीपासून नवीन कार्यकारिणीत जुन्यांना डावलण्यात आल्याची ओरड आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली तरी जुने व निष्ठावान कार्यकर्ते प्रचारापासून लांब होते. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप संघटनात्मक मोठे फेरबदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामागे पक्षांतर्गत समन्वय आणि नियोजनाचा अभाव हेदेखील एक कारण सांगितले जात आहे.