Padalkar-Awhad Clashes: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी सायंकाळी एक लाजिरवाणा प्रकार घडला. विधिमंडळाच्या आवारात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.या घटनेत गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केल्याची माहिती आहे. अचानक पेटलेला वाद हातघाईपर्यंत पोहोचल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच विधानभवनातील सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय संस्कृतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सभागृहाबाहेरील शिस्तीवर गंभीर चर्चा सुरू आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांना ऐकू जाईल अशा आवाजत मंगळसूत्र चोर अशा शब्दांत खिल्ली उडवली होती. त्यानंतर पडळकरांनी बुधवारी जितेंद्र आव्हाडांना प्रवेशद्वारावर शिवीगाळ केली होती. त्याच रागातून आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्ते भिडल्याचे सांगितले जाते.
पण या घटनेनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांच्याबाबत सोशल मिडीयावर अत्यंत आक्षापार्ह भाषेत पोस्ट लिहण्यात आली आहे, नताशा आव्हाडने सोशल मिडीयावर त्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणि मुंबई पोलिसांना टॅग करत आपला संतापाची भावना व्यक्त केली आहे.
जसा राजा, तशी प्रजा! सगळे गुंडे. या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाही, तरीही या नीच लोकांकडून मला यात ओढले जात आहे. @Dev_Fadnavis@MumbaiPolice तुम्ही मजा पाहत राहा फक्त! अशा शब्दांत नताशा आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ आणि मुलगी अर्शीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
जसा राजा, तशी प्रजा! सगळे गुंडे.
या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाही, तरीही या नीच लोकांकडून मला यात ओढले जात आहे.@Dev_Fadnavis @MumbaiPolice तुम्ही मजा पाहत राहा फक्त! pic.twitter.com/pG6a1dTYkQ
— Natasha Awhad (@NatashaASpeaks) July 17, 2025
गोपीचंद पडळकर यांचे समर्थक असं या प्रोफाईलमध्ये लिहीलं आहे. त्यांच्या समर्थकांच्या एकपेक्षा अधिक पोस्ट करण्यात आल्या आहेत. “ज्याच्या पोरीने #मंगळसूत्र घालणारा न निवडता इतरधर्मीय निवडला तो आता मंगळसूत्राच्या नावाने गावभर बोंबलत आहे! बेटी*** *** कॉकटेल फॅमिलीचा पाळीव कुत्रा…” अशा शब्दांत पोस्ट करत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना पोस्ट टॅग केली आहे.
गुरुवारी सायंकाळी सुमारे 5.30 च्या सुमारास विधिमंडळाच्या तळमजल्यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख उभे असताना, त्यांच्याजवळच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक ऋषिकेश टकले देखील उपस्थित होते. देशमुख हे आव्हाड यांचे समर्थक असल्याचे लक्षात येताच टकले यांनी त्यांच्यावर शिवीगाळ करत थेट अंगावर धाव घेतली.
या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि पाहता पाहता हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचले. टकले यांनी देशमुख यांचा कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. ही संपूर्ण घटना उपस्थितांनी मोबाईलमध्ये चित्रीत केली. घटनेनंतर विधानभवनातील सुरक्षा रक्षकांनी दोघांनाही तत्काळ बाजूला करत हस्तक्षेप केला आणि प्रसंग आटोक्यात आणला. या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी टकले आणि देशमुख यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मात्र, चौकशीदरम्यान टकलेला सुरक्षारक्षकांकडून तंबाखू मळून दिल्याची गंभीर तक्रार आमदार जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी विधानसभाध्यक्षांकडे केली आहे.
दरम्यान, झटापटीत गुंतलेला ऋषिकेश ऊर्फ सर्जेराव बबन टकले हा शिव मल्हार क्रांती सेनेचा सांगली जिल्हाध्यक्ष असून, 2016 ते 2021 या कालावधीत त्याच्याविरुद्ध सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याशिवाय, त्याच्याविरोधात झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसारही (MPDA) कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे विधानभवनातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.