पुणे : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, किटकनाशकांची अजिबात कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी; बियाणे, कृषि निविष्ठांच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे आणि भरारी पथके कार्यान्वित करुन चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करत गैरप्रकारांना आळा घालावा, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
विधानभवन येथे आयोजित पुणे महसूल विभाग खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण, ‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक कौतुभ दिवेगावकर, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी, सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ज्ञानेश्वर खिलारी, संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.