
Fertilizer Sale Via FFS App Mandatory From Sept 30 Agriculture Dept
३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर ऑनलाइन बुकिंग केल्यानंतरच शेतकऱ्यांना खत खरेदी करता येणार आहे.त्यामुळे जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळेत ॲप डाउनलोड करून आवश्यक खताची आगाऊ नोंदणी व बुकिंग करून घ्यावे,असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या डिजिटल प्रणालीमुळे खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध असलेला खतसाठा, त्यांचे पीक व क्षेत्रफळ यानुसार मिळणारे खताचे प्रमाण तसेच जवळचे अधिकृत विक्री केंद्र याबाबतची माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.त्यामुळे खत वितरणामध्ये पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या Android मोबाईलमधील Google Play Store वरून FFS ॲप डाउनलोड करावे. त्यानंतर आवश्यक भाषा व राज्याची निवड करून आधार क्रमांक किंवा Farmer ID च्या माध्यमातून OTP द्वारे लॉगिन करावे.लॉगिन केल्यानंतर शेतकऱ्याच्या नावावरील जमीन व पिकांची माहिती ॲपवर पाहता येणार आहे. संबंधित क्षेत्रफळ व पिकांच्या आधारे उपलब्ध खत कोट्याची माहितीही ॲपमध्ये दिसणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आवश्यक खताचा प्रकार, पोत्यांची संख्या आणि जवळचे अधिकृत खत विक्री केंद्र निवडून ऑनलाइन बुकिंग करता येईल.
ऑनलाइन बुकिंग यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या मोबाईलवर QR Code अथवा E-Token उपलब्ध होईल. शेतकऱ्याने बुकिंगच्या वेळी निवडलेल्या अधिकृत खत विक्री केंद्रावर हा QR Code दाखविल्यानंतर आवश्यक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून बुक केलेले खत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
FFS ॲपमुळे शेतकऱ्यांना खताची आगाऊ नोंदणी करता येणार असल्याने खत विक्री केंद्रांवरील गर्दी आणि रांगेत लागणारा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच कोणत्या शेतकऱ्याने किती खत बुक केले,कोणत्या केंद्रावरून खत घेणार आहे,याची डिजिटल नोंद राहणार असल्याने खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.
“३० सप्टेंबरपासून FFS ॲपद्वारे ऑनलाइन बुकिंग केल्यानंतरच खत खरेदी करता येणार आहे.त्यामुळे गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या प्रणालीची माहिती पोहोचवावी.शेतकऱ्यांनी वेळेत ॲप डाउनलोड करून नोंदणी करावी आणि आवश्यक खताचे आगाऊ बुकिंग करून घ्यावे,”असे आवाहन कृषी अधिकारी निलेश बुधवंत, पंचायत समिती जुन्नर यांनी केले आहे.खताची गरज ऐन हंगामात निर्माण झाल्यानंतर घाई करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी वेळेत FFS ॲपवर नोंदणी करून आवश्यक खताचे बुकिंग करून ठेवावे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
Fertilizer Sale Via FFS App Mandatory From Sept 30 Agriculture Dept Urges Junnar Farmers To Register