
‘पावसाची आस, बळीराजाचा श्वास’; बैलांच्या अंगावर दुष्काळाची व्यथा, अहिल्यानगरमध्ये पोळ्यावर संकटाचे सावट
सण साजरा करण्याचा उत्साह उरलेला नसतानाही, हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी अत्यंत हृदयद्रावक आणि आक्रमक पद्धतीने प्रशासनासमोर आपली व्यथा मांडली. बैलांच्या अंगावर ‘दुष्काळ जाहीर करा’, ‘पावसाची आस बळीराजाचा श्वास’, ‘चाऱ्याविना पोट रिकामे, तरी राबतो तुमच्यासाठी’ असे आक्रमक संदेश व फलक लिहून शेतकऱ्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने पोळा साजरा केला.
“१९७२ च्या भीषण दुष्काळासारखी परिस्थिती आज जिल्ह्यात निर्माण झाली आहे. अशी भयंकर परिस्थिती आम्ही यापूर्वी कधीही पाहिली नाही. त्यामुळे शासनाने कागदी घोडे न नाचवता तात्काळ मदतीची उपाययोजना करावी,” अशी आर्त हाक स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे.
या भीषण परिस्थितीवर प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय फुंदे यांनी थेट सरकारवर निशाणा साधला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ अभ्यास करत न बसता परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. जनावरांच्या छावण्या आणि चारा डेपो सुरू करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी,” अशी थेट मागणी फुंदे यांनी केली आहे. पावसाअभावी हाताशी आलेली पिके जळून खाक झाली आहेत, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. आता तरी शासन-प्रशासन जागे होऊन या हवालदिल झालेल्या बळीराजाला आधाराचा हात देणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
“गेल्या तीन महिन्यांपासून आमच्या भागात पाऊसच झालेला नाही. शेतातील पिके पार जळून गेली आहेत. आज पोळ्याचा सण आहे, पण आमच्या बैलांना द्यायला पोटभर चारा नाही आणि पाजायला पाणी नाही. सण कसा साजरा करायचा? शासनाने लवकरात लवकर आमची ही परिस्थिती पाहून मदत जाहीर करावी.”, शेतकरी भागवत मोरे यांनी दिली.
“१९७२ च्या दुष्काळाची जी परिस्थिती होती आज तशीच भीषण परिस्थिती स्वतः अनुभवतोय. सर्जा-राजा रात्रंदिवस आमच्यासाठी राबतो, पण आज त्यांना उपाशी ठेवावे लागत आहे, याचे प्रचंड दुःख होत आहे. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून चारा छावण्या सुरू कराव्यात.”,शेतकरी श्रीधर निकम यांनी माहिती दिली.
“घरात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची मोठी मारामारी सुरू आहे. पोळ्याच्या दिवशी घराघरांत आनंद असायचा, पण आज फक्त डोळ्यात पाणी आहे. पिके वाळल्यामुळे कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ आधाराचा हात द्यावा.” – भाग्यश्री आपशेटे, शेतकरी महिला
“दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत हाताबाहेर गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ अभ्यास आणि बैठका करत न बसता, परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे. अहिल्यानगर जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि जनावरांसाठी छावण्या व चारा डेपो सुरू करून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल.” -दत्तात्रय फुंदे उपजिल्हाप्रमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Sports News: भारतातील शालेय क्रीडेला टेक्नॉलॉजीची साथ! कबुनीचा 400 शाळा जोडण्याचा मोठा प्लॅन