
फोटो सौजन्य: Gemini
शेडगे यांच्या म्हणण्यानुसार, कारखाना आणि त्याअंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा खर्च भागवण्यासाठी कामगारांच्या नावे बँक कर्जे काढण्यात आली. ही कर्जे थकित झाल्याने संबंधित बँकांनी आता थेट कामगारांना नोटिसा बजावल्या आहेत. कर्ज फेडले नाही तर मालमत्ता जप्तीचा इशारा दिल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नावावर थकीत कर्ज असल्याने कामगारांना नव्याने कर्ज मिळणे अशक्य झाले असून, कामगार पतसंस्था व पतपेढ्यांचे हप्तेही थकित झाले आहेत. यामुळे व्याजाचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्व बाजूंनी आर्थिक कोंडीत सापडल्याने अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप शेडगे यांनी केला आहे. या संपूर्ण परिस्थितीसाठी अशोक कारखान्याचे संचालक मंडळ आणि चेअरमन, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या गैरकारभाराला जबाबदार धरले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चेअरमन यांच्या चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळेच कारखाना आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप त्यांनी केला.
एकीकडे कामगार अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत असताना, दुसरीकडे कारखान्याचे चेअरमन व त्यांचे कुटुंबीय ऐषआरामात जीवन जगत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारखान्याचे ड्रायव्हर खासगी कामांसाठी, तर कर्मचारी शेतीच्या कामासाठी वापरले जात असल्याचेही शेडगे यांनी सांगितले.
कामगार संकटात असताना चेअरमन राजकारण व निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे. मात्र दहशत आणि दबावामुळे अनेक कामगार तक्रार न करता अन्याय सहन करत असल्याचे चित्र आहे.
अनेक कामगारांनी परिस्थितीला कंटाळून राजीनामे दिले असल्याचे सांगण्यात आले. मात्र राजीनामा दिल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतरही ग्रॅच्युटी, बोनस तसेच भविष्य निर्वाह निधी (PF) वेळेवर दिला जात नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही कामगार उदरनिर्वाहासाठी शेतीच्या कामावर रोजंदारीने काम करत असल्याचेही समोर आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी निलेश शेडगे यांनी केली असून, अशोक कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांनाच या दुर्दशेस जबाबदार धरले पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.