
Ahilyanagar News: विखे- जगताप यांची जादू चालली! भाजप-राष्ट्रवादी युतीला नगरमध्ये बहुमत
निकाल जाहीर होताच पहिल्या प्रभागापासूनच भाजप–राष्ट्रवादी युतीने जोरदार आघाडी घेतली. प्रभाग क्रमांक ४, ९ आणि १२ हे काही अपवाद वगळता, बहुतेक सर्व प्रभागांमध्ये युतीने वर्चस्व राखले. अनेक ठिकाणी हजारोंच्या मताधिक्याने युतीचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली असून, येथे भाजपने बाजी मारली.
Maharashtra Politics: ‘एआयएमआयएम’ भाजप की ‘इंडिया’ आघाडीशी युती करणार? ओवेसींनी स्पष्टच सांगितलं…
६८ जागांच्या महापालिकेत भाजपचे ३ आणि राष्ट्रवादीचे २ असे एकूण ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ६३ जागांसाठी निवडणूक झाली. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३५ जागांचा आकडा सहज पार करत राष्ट्रवादी (२७) आणि भाजप (२५) अशा एकूण ५२ जागा युतीने जिंकल्या.
महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली असली तरी काँग्रेसला फक्त २ आणि शिवसेना (उबाठा) गटाला १ जागा मिळाली. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळवता आली नाही. शिंदे गटाच्या शिवसेनेने १० जागा जिंकल्या, मात्र जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव आणि त्यांच्या पत्नी अश्विनी शिंदे यांचा पराभव झाला.
मुकुंदनगर या मुस्लिमबहुल भागात एमआयएम आणि काँग्रेस यांनी प्रत्येकी २ जागा जिंकल्या. या भागावगळता काँग्रेसला अन्यत्र यश मिळाले नाही. बहुजन समाज पक्षाला १ जागा मिळाली.
याआधी तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर समाधान मानणारा भाजप यावेळी थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. तब्बल २५ जागा मिळाल्याने भाजप नेतृत्वालाही हे यश अपेक्षेपेक्षा मोठे असल्याचे मानले जात आहे. आमदार संग्राम जगताप यांनी युतीसाठी केलेले प्रभावी काम आणि भाजप उमेदवारांना दिलेले पाठबळ निर्णायक ठरले.
शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांचा भाजपचे युवा नेते सुजय मोहिते यांनी, तर शहरप्रमुख सचिन जाधव यांचा भाजपचे सागर मुर्तडकर यांनी पराभव केला. या विजयामुळे भाजपचे हे दोन्ही चेहरे ‘जायंट किलर’ ठरले आहेत.
महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापौर कोण होणार, या प्रश्नावर डॉ. सुजय विखे यांनी सांगितले की, अद्याप आरक्षण जाहीर झालेले नाही. मात्र महापौरपदासह सर्व पदांचे वाटप आधीच ठरले असून, दोन्ही पक्षांच्या सह्या असलेला निर्णयाचा कागद बंद पाकिटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.