
फोटो सौजन्य: Gemini
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर सत्ताधारी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिनेश फटांगरे याने सोशल मीडियावर अत्यंत वादग्रस्त व अपमानास्पद पोस्ट शेअर केली होती. या प्रकरणी दैनिक युवावार्ताने बातमी प्रकाशित केल्यानंतर फटांगरे याने संतप्त होऊन फेसबुक पेजवर दैनिक युवावार्ताचे संपादक किसनभाऊ हासे यांच्याविषयीही खालच्या पातळीवर जाऊन अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट केली.
या प्रकारामुळे शहरासह सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात असून, गेल्या दोन दिवसांपासून सर्वपक्षीय कार्यकर्ते, पत्रकार आणि सामाजिक संघटनांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Sunetra Pawar Oath Ceremoney: सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आजच करण्यामागचे कारण काय?
या प्रकरणी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फटांगरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर वर्तमानपत्र व संपादकांची बदनामी करून धमकी दिल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आणि बीएनएस अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकारांना धमकी व बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर शहरात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.
दरम्यान, फटांगरे याने आमदार सत्यजित तांबे यांच्याविरोधातही अत्यंत गलिच्छ आणि अपमानास्पद पोस्ट शेअर केली असून, त्याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीनेही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अवघ्या दोन दिवसांत तीन गुन्हे दाखल होऊनही आरोपी फरार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या व्यक्तीने केवळ एका वर्तमानपत्राचीच नव्हे तर संपूर्ण प्रसारमाध्यमांची बदनामी केली आहे. सलग तीन गुन्हे दाखल होऊनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे दुर्दैवी असल्याचे सांगत, त्याला तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी दैनिक युवावार्ताचे संस्थापक किसनभाऊ हासे यांनी केली आहे.
भाजपला सत्तेचा अहंकार, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन
स्व. अजितदादांबाबत घडलेल्या घटनेची बातमी दैनिक युवावार्ताने कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्रसिद्ध केली होती. मात्र या बातमीवरून दुखावल्याने फटांगरे याने कमेंट करत खालच्या पातळीवर टीका केली तसेच संपादकांवर वैयक्तिक स्वरूपाची अश्लील पोस्ट केली. याआधीही त्याने धमकीवजा व अपमानास्पद पोस्ट केल्याचे समोर आले आहे.
सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार आणि विविध पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे व शहर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. आमदार अमोल खताळ यांनीही वारंवार समज देऊनही फटांगरे याने बदनामीकारक कृत्ये सुरूच ठेवल्यामुळे शिवसेनेने त्याची पदावरून हकालपट्टी केली आहे. मात्र त्याची पक्षातूनही कायमस्वरूपी हकालपट्टी करावी, अशी मागणी होत आहे.