
अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय हालचाली, शपथविधीवर मतभेद; नागरिकांच्या प्रतिक्रीया वाचा सविस्तर
या प्रकरणात आता शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला नवे वळण मिळाले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, “सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, अशी कोणतीही अधिकृत माहिती मला नाही.” तसेच, “कोणी शपथ घ्यायची, कोणी मंत्रिमंडळात सहभागी व्हायचं, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे स्पष्ट करत त्यांनी या विषयावर थेट भाष्य टाळले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, शरद पवारांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. एकीकडे त्यांनी या घडामोडींपासून अंतर राखण्याची भूमिका घेतली असली, तरी दुसरीकडे पक्षांतर्गत निर्णयांमध्ये हस्तक्षेप न करण्याचा संकेतही दिला आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील राजकीय निर्णयांबाबत वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका काय असेल, याबाबतची अनिश्चितता कायम आहे.
दरम्यान, नागरिकांमधील भावना दोन टोकांवर विभागल्या गेल्याचे दिसते. एका बाजूला, शोकाकुल वातावरणात सत्तेचा निर्णय घेणे नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः बारामती आणि पुणे जिल्ह्यातील काही कार्यकर्ते या निर्णयाकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला, अजित पवार हे “कामाला प्राधान्य देणारे नेते” होते, त्यामुळे प्रशासन थांबू न देता जबाबदारी स्वीकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मतही पुढे येत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, या संपूर्ण प्रकरणात सहानुभूती, सत्ता आणि पक्षांतर्गत समीकरणे यांचा गुंता स्पष्टपणे दिसून येतो. शरद पवारांच्या भूमिकेमुळे हा विषय आणखी संवेदनशील झाला असून, पुढील काळात जनतेची प्रतिक्रिया आणि पक्षाची अधिकृत भूमिका यावरच या निर्णयाचे राजकीय परिणाम ठरणार आहेत.
नागरिकांच्या प्रतिक्रिया
दुःखाच्या काळात सत्ता स्वीकारण्याचा निर्णय जनभावनेशी विसंगत आहे, असे मत विक्रम जाधवराव यांनी व्यक्त केले आहे.
“कुटुंब आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता घेतलेला निर्णय चुकीचा संदेश देतो, असं सुशांत वांढेकर यांनी म्हटलं आहे.
अजित दादा कामाला प्राधान्य देणारे होते, त्यामुळे जबाबदारी स्वीकारणे योग्य आहे, असं आनंद बोरकर म्हणाले.
राज्यातील सत्तास्थैर्य राखण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता, असं मत तुषार जाधव यांनी मांडलं आहे.