
फोटो सौजन्य: iStock
पाथर्डी तालुक्यात यंदाच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. पाण्याखाली गेलेली शेती, वाहून गेलेली जमीन आणि उद्ध्वस्त झालेली पिके यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची घोषणा केली होती. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या दौऱ्यात दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळे सरसकट शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असेही सांगितले होते.
मात्र, दिवाळी संपून दीड महिना उलटला असतानाही शेकडो शेतकऱ्यांना अद्याप एकाही रुपयाची मदत मिळालेली नाही.
मिरी, करंजी, तिसगाव, चिचोंडी, शिराळ, कोल्हार, धारवाडी, गितेवाडी, डमाळवाडी, डोंगरवाडी, लोहसर, खांडगाव, भोसे अशा अनेक गावांमध्ये अतिवृष्टी आणि पुराचा मोठा तडाखा बसला. मका, तूर, उडीद, कांदा, सोयाबीन, कपाशी, बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले असून फळबागा आणि फुलशेतीला सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनीच वाहून गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत.
महसूल विभागाने पंचनामे करून माहिती शासनाकडे पाठविल्याचे सांगितले जात असले तरी निधी मिळण्याचा वेग अत्यंत मंद आहे.
शासनाकडून निधी वितरणाचा वेग मंद असल्याने शेतकरी तहसील कार्यालये आणि बँकांच्या उंबरठ्यावर हेलपाटे घालत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. कर्जफेड, बियाण्यांची व्यवस्था, रब्बी पेरणी – काहीच हातात पैसा नसल्याने कठीण झाले आहे.
Jalna News : पहिल्या वारकरी साहित्य संमेलनचा मुहूर्त ठरला! संमेलनाध्यक्षपदी डॉ. सतीश बडवे यांची निवड
काही शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती अपूर्ण असल्याने किंवा तांत्रिक त्रुटींमुळे निधी अडकल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे. मात्र, मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे.
कृषिमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. पण दिवाळीला महिना उलटूनही शेतकरी वंचित असल्याने ग्रामस्थ आणि शेतकरीवर्गामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “आम्हाला आश्वासने नकोत, प्रत्यक्षात मदत हवी.” पाथर्डी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत.